पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
१२ महिन्यांत स्मारक उभारणार!
पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा
दोन कोटींच्या प्रकल्पाच्या दर्जासह देखभाल आणि संवर्धनावर भर
वैभववाडी :
पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून वैभववाडी तालुक्यातील हेत या त्यांच्या मूळगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम पुढील १२ महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्मारक उभारणे एवढेच महत्त्वाचे नसून ते दर्जेदार असावे, त्यातून नारायण सुर्वे यांचे विचार आणि साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, तसेच त्याची नियमित देखभाल व्हावी, यावर त्यांनी विशेष भर दिला.
स्मारकातून नारायण सुर्वे यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचणार
नारायण सुर्वे हे कोकणातील एक अनमोल रत्न असून, त्यांच्या मूळगावी भव्य स्मारक उभारण्यामागे त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण कायम जिवंत ठेवण्याचा उद्देश असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. सुर्वे कुटुंबीयांसह त्यांना मानणाऱ्या असंख्य साहित्यप्रेमींसाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरणार आहे. वैभववाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण सुर्वे यांच्यासारखे महान साहित्यिक होऊन गेले, याची जाणीव भावी पिढीला या स्मारकाच्या माध्यमातून व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वाचनालय, बहुउद्देशीय सभागृहासह विविध सुविधा
या स्मारक परिसरात वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह, कार्यालय, बाहेरील बाजूस बहुउद्देशीय व्यासपीठ तसेच स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. मात्र, केवळ इमारत उभारणे हा या प्रकल्पाचा उद्देश नसून नारायण सुर्वे यांनी कोणत्या परिस्थितीत जीवनप्रवास केला, त्यांच्या कविता कोणत्या सामाजिक वास्तवातून निर्माण झाल्या आणि त्यांनी कष्टकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा व परिवर्तनाचे विचार कशा प्रकारे मांडले, याची माहिती या वास्तूतून मिळाली पाहिजे, असे राणे यांनी स्पष्ट केले.
नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा, जीवनप्रवासाचा आणि सामाजिक योगदानाचा अभ्यास करून त्यांचे विचार पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवणारे स्मारक उभारण्यात येईल, असा विश्वास त्यांनी सुर्वे कुटुंबीयांना दिला.
स्मारकाच्या देखभालीची जबाबदारीही महत्त्वाची
स्मारकाच्या भूमिपूजनानंतर त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे जितके आवश्यक आहे, तितकीच त्याची देखभाल करणेही महत्त्वाचे आहे, असे नितेश राणे यांनी ठामपणे सांगितले. अनेक ठिकाणी स्मारकांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उत्साहात होते; मात्र त्यानंतर स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते, असा अनुभव त्यांनी मांडला.
हेत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्मारकाचा दर्जा व स्वच्छता टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा अन्य संबंधित यंत्रणांपैकी नेमकी कोणाची असेल, याबाबत स्पष्ट व्यवस्था असावी. निधीअभावी किंवा जबाबदारी निश्चित नसल्यामुळे स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटनाला नारायण राणे, आशिष शेलार, उदय सामंत उपस्थित राहणार
या स्मारकाच्या भूमिपूजनाला खासदार नारायण राणे यांना उपस्थित राहण्याची इच्छा होती. मात्र, प्रकल्पाच्या सुरुवातीऐवजी स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्यांना या वास्तूचा अनुभव देता यावा, या उद्देशाने त्यांना उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. स्मारकाच्या उद्घाटनासाठी खासदार नारायण राणे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
या स्मारकाच्या उभारणीबाबत आशिष शेलार आणि उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, उद्घाटनाची तारीख कळवल्यानंतर अन्य कार्यक्रम रद्द करून उपस्थित राहण्याचा शब्द त्यांनी दिल्याचे राणे यांनी सांगितले.
महाराणा प्रताप स्मारकाचा उल्लेख; कामावर बारकाईने लक्ष ठेवणार
वैभववाडीतील महाराणा प्रताप स्मारकाचा उल्लेख करताना नितेश राणे यांनी स्मारकांच्या उभारणीबरोबरच त्यांचे व्यवस्थापन आणि देखभालही तितकीच महत्त्वाची असल्याचे नमूद केले. नारायण सुर्वे स्मारकाच्या कामावर पालकमंत्री म्हणून बारकाईने लक्ष ठेवणार असून, प्रकल्प वेळेत किंवा निर्धारित मुदतीच्या आधी पूर्ण झाल्यास जनतेकडून त्याचे कौतुक होईल, असे ते म्हणाले.
स्मारकाच्या कामासाठी १२ महिन्यांची मुदत लक्षात घेऊन कामाचा कालावधी सुरू झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
नारायण सुर्वे यांच्या कवितेतून कष्टकरी जीवनाचे दर्शन
आपल्या भाषणादरम्यान नितेश राणे यांनी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेतील ओळी सादर केल्या. भाकरीचा चंद्र शोधण्यात गेलेले आयुष्य, कष्टकरी समाजाच्या वाट्याला आलेले दुःख आणि संघर्ष यांचे चित्रण करणाऱ्या या कवितेतून सुर्वे यांच्या साहित्याची सामाजिक जाणीव अधोरेखित होते. साहित्यिकाच्या स्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी त्यांच्या कवितेचे सादरीकरण करून राणे यांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाला अभिवादन केले.
भाषणात स्वतःच्या अनुभवाचा संदर्भ देताना त्यांनी, “आता मी जुना झालो आहे, माती लावलेला पैलवान झालो आहे,” अशा शब्दांत मिश्किल टिप्पणीही केली. नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा सन्मान करताना त्यांच्या विचारांचा प्रत्यक्ष जीवनात अंगीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या भाषणातून अधोरेखित झाले.
सरकारच्या माध्यमातून महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य जतन करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांची स्मारके उभारताना त्यांच्या केवळ आठवणी जतन न करता त्यांचे विचार, कार्य आणि सामाजिक योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार असताना नारायण सुर्वे स्मारकाच्या विषयावर भालचंद्र साठे वारंवार पाठपुरावा करत होते. त्या काळात मर्यादित निधीमुळे या कामाला अपेक्षित गती मिळू शकली नव्हती. आता शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून अशा महान व्यक्तिमत्त्वांना योग्य सन्मान देण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेत येथे स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या सुर्वे कुटुंबीयांचे, लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच वैभववाडी मतदारसंघातील विकासकामांबाबत नागरिकांनी चिंता करू नये, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, सुभाष रावराणे, उपसभापती साची कोलते, श्रावणी रावराणे, भाजप मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासिर काझी, भालचंद्र साठे, वैभववाडी गटविकास अधिकारी, वैभववाडी तहसीलदार, प्राची तावडे, माजी महिला व बालकल्याण सभापती शारदा कांबळे, दीपक फोंडके, किशोर कांबळे, रिद्धी सुतार, देवानंद पालांडे, राजा राणे, मधुकर सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, बाळकृष्ण सुर्वे, रमाकांत सुर्वे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सुर्वे कुटुंबीय आणि हेत ग्रामस्थ उपस्थित होते.
