सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या १० दुकानांवर कारवाई; ₹२३,५०० दंड वसूल
सांगली : प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार
सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ३ च्या कार्यक्षेत्रात मा. आयुक्त महोदया यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान १० दुकानांची तपासणी करून एकूण ₹२३,५०० दंड वसूल करण्यात आला, तसेच अंदाजे १२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नागरिक व व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकविरोधातील ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर किंवा विक्री करताना आढळणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
महानगरपालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व व्यावसायिकांना शासनाने प्रतिबंधित केलेल्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. प्लास्टिकमुक्तीच्या प्रयत्नांना सहकार्य करून शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने योगदान द्यावे, असेही आवाहन करण्यात आले.
मोहिमेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
या कारवाई मोहिमेत स्वच्छता अधिकारी सिद्धांत ठोकळे, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, गणेश धोतरे आणि अंजली कुदळे यांनी सहभाग घेतला.
