You are currently viewing राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जिम सहा महिन्यांपासून नादुरुस्त; भटक्या कुत्र्यांचाही वावर

राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जिम सहा महिन्यांपासून नादुरुस्त; भटक्या कुत्र्यांचाही वावर

राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जिम सहा महिन्यांपासून नादुरुस्त; भटक्या कुत्र्यांचाही वावर

उद्यान विभागाच्या दुर्लक्षाबाबत अण्णा जोगदंड यांची नाराजी; दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, नागरिकांचा सवाल

पिंपळे गुरव, प्रतिनिधी :

पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जिमचे साहित्य गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त असून, उद्यानात भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढला आहे. या समस्यांकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केला आहे.
राजमाता जिजाऊ उद्यानात दररोज सकाळी नागरिक व्यायाम आणि फिरण्यासाठी येतात. मात्र, ओपन जिमचे साहित्य नादुरुस्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना अनेकदा सांगूनही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून साहित्य दुरुस्त करावे, अशी मागणी जोगदंड यांनी केली.
या समस्येबाबत उद्यान सहाय्यक अधीक्षक राजेश वसावे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी बोलून कार्यवाही करण्याचे सांगितले. त्यानंतर उद्यान सुपरवायझर अजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, ओपन जिमच्या साहित्याची जबाबदारी ड प्रभागाच्या क्रीडा विभागाकडे असल्याचे त्यांनी सांगितले. ड प्रभागाचे उद्यान पर्यवेक्षक अशोक शिंदे यांनीही काम करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्ष दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
उद्यानात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याचे पंडित वनस्कर यांनी सांगितले. उद्यानाला संरक्षक भिंत असतानाही मुख्य प्रवेशद्वारातून भटकी कुत्री आत कशी येतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली.
ओपन जिमच्या साहित्याच्या दुरुस्तीची जबाबदारी एकमेकांकडे सोपविण्याऐवजी संबंधित विभागाने समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी. सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन नेमके कोणाकडे जायचे, असा संतप्त सवाल अण्णा जोगदंड यांनी उपस्थित केला.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सचिव गजानन धाराशिवकर, महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, शहराध्यक्षा संजना करंजावणे, काळुराम लांडगे, पंडित वनस्कर आणि आदेश जोमवाळे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा