You are currently viewing आंबोली घाटात ७० फुट दरीत टेम्पो कोसळून चंदगड येथील चालक ठार…

आंबोली घाटात ७० फुट दरीत टेम्पो कोसळून चंदगड येथील चालक ठार…

आंबोली

येथील घाटात सुमारे ७० फुट खोल दरीत टेम्पो कोसळून चंदगड येथील चालक जागीच ठार झाला. ही घटना काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पुंडलिक सुरेश आसगावकर (रा. मांडवळे, वय-२९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान आज सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. आसगावकर हा गोवा येथे काजू बोंडू देण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंदगड येथील आसगावकर हा चालक काजू बोंड घेवून काल सायंकाळी गोवा येथे एकटाच गेला होता. तेथून परतत असताना यु-टर्नच्या वर आंबोलीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याचा त्याला अंदाज आला नाही. आणि त्याचा टेम्पो थेट दरीत कोसळला

याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना आज सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई, दिपक शिंदे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. मृतदेह खोल दरीत असल्यामुळे आंबोली रेस्कु टिमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रेस्कु टिमचे दिपक मेस्त्री, प्रथमेश गावडे, विजय राऊत, वामन पालयेकर, सहदेव सनाम आदींच्या मदतीने आसगावकर याचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.

आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी त्या ठिकाणी धाव घेवून पाहणी केली.  मृत आसगावकर यांचे पाच वर्षापुर्वी लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी व दोन आणि चार वर्षाची अशा दोन मुली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा