You are currently viewing महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा

महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा

*महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा*

*आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर*

मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशने आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, प्रभावी व्यवस्थापन प्रणाली आणि मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी विकास मॉडेलचा सखोल अभ्यास करून त्यातील आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी कार्यपद्धती महाराष्ट्रातही राबविण्याच्या उद्देशाने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. श्री. नितेश राणे यांनी ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा केला. राज्यातील मत्स्यपालन, मत्स्योत्पादन, प्रक्रिया उद्योग आणि बंदर क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. या निधीचा प्रभावी विनियोग करून राज्यातील मत्स्यपालन आणि मत्स्योत्पादन वाढविणे, मच्छीमारांचे उत्पन्न उंचावणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, या उद्देशाने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात आंध्र प्रदेशच्या ॲक्वाकल्चर मॉडेलचा अभ्यास करताना आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती, खाद्यनिर्मिती, रोगनिदान, व्यवस्थापन प्रणाली, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनाच्या विविध संधींची माहिती घेण्यात आली.

*पहिला दिवस : बंदर विकास, सागरी पायाभूत सुविधा आणि कौशल्यविकास*
अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेश सचिवालयात राज्याचे पायाभूत सुविधा व गुंतवणूक तसेच रस्ते, इमारती आणि बंदरे विभागाचे मंत्री मा. श्री. बी. सी. जनार्दन रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील सागरी परिसंस्था अधिक सक्षम करणे, बंदर विकासाला चालना देणे, सागरी पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि परस्पर सहकार्यातून विकासाच्या नव्या संधी निर्माण करणे, या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यानंतर कृष्णापट्टणम येथील अदानी पोर्टला भेट देऊन बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्गो हाताळणी व्यवस्था, खोल पाण्यातील जहाजांसाठी उपलब्ध सुविधा आणि आधुनिक कार्यपद्धतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सुमारे २१ किलोमीटर किनारपट्टी, थेट रेल्वे जोडणी आणि राष्ट्रीय महामार्गशी असलेली जोडणी यांमुळे या बंदराला प्राप्त झालेले महत्त्वही यावेळी जाणून घेण्यात आले.

या भेटीदरम्यान कार्गो हँडलिंग इक्विपमेंट ट्रेनिंग सिम्युलेटर तसेच ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी एक्सलन्स सेंटरचीही पाहणी करण्यात आली. बंदर क्षेत्रासाठी कुशल, प्रशिक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करू शकणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण पद्धती व कौशल्यविकास उपक्रमांची माहिती घेण्यात आली.

महाराष्ट्रात विकसित होत असलेले मरीन क्लस्टर, वाढवण बंदर आणि दिघी बंदर यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ही गरज लक्षात घेऊन अशा प्रकारचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामुळे स्थानिक युवकांना बंदर आणि सागरी उद्योग क्षेत्रात कौशल्याधारित प्रशिक्षणासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.

*दुसरा दिवस : आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, खाद्यनिर्मिती आणि मूल्यवर्धन*

अभ्यास दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विजयवाडा येथील मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला. आंध्र प्रदेशमध्ये मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढीसाठीचे उपक्रम आणि प्रभावी व्यवस्थापन प्रणालींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यानंतर AquaExchange या संस्थेच्या IoT-सक्षम मत्स्यपालन प्रकल्पाला भेट देऊन तंत्रज्ञानाधारित मत्स्यपालन व्यवस्थेचा सखोल अभ्यास करण्यात आला. तलाव आणि पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम निरीक्षण, स्वयंचलित खाद्य व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित फार्म इंटेलिजन्स, ऊर्जा व्यवस्थापन, मत्स्यपालनातील पीक मॉनिटरिंग, रोगनिदान आणि डेटावर आधारित निर्णयप्रक्रिया अशा विविध आधुनिक उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्यपालन अधिक शास्त्रोक्त, कार्यक्षम आणि उत्पादनक्षम करण्याच्या संधींचाही आढावा घेण्यात आला.

त्यानंतर बोम्मुलुरू येथील Deepak Nexgen या ॲक्वाकल्चर फीड निर्मिती प्रकल्पाला भेट देण्यात आली. मत्स्यपालन आणि कोळंबीपालनासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्याची निर्मिती प्रक्रिया, पोषण व्यवस्थापन, खाद्याची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील मत्स्यपालन क्षेत्रासाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल, याचाही अभ्यास करण्यात आला.

नरसिंहपुरम APQA Private Limited येथे भेट देऊन मत्स्य व कोळंबी प्रक्रिया करताना उरलेल्या टाकाऊ पदार्थांचा उपयोग करून विविध मूल्यवर्धित उत्पादने कशी तयार केली जातात, याची माहिती घेतली. माशांच्या खवल्यांपासून, कोळंबीपासून औषधे, सौंदर्यप्रसाधने, साबण आदी कॅल्शियम, प्रोटीन, तेल, चिटिन आणि इतर उत्पादने तयार करण्याच्या आधुनिक पद्धतींची पाहणी केली.

प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर, संसाधनांचा अधिकाधिक उपयोग, अपव्यय कमी करणे आणि उपपदार्थांपासून अतिरिक्त आर्थिक मूल्य निर्माण करणे या दृष्टीने उपलब्ध असलेल्या संधींचा यावेळी अभ्यास करण्यात आला. अशा उद्योगांमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मूल्यसाखळी अधिक सक्षम होण्यास आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

*तिसरा दिवस : प्रक्रिया उद्योग, निर्यात आणि वैज्ञानिक संशोधनाचा अभ्यास*

अभ्यास दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आंध्र प्रदेशातील रायालम आणि भीमावरम परिसरातील जगदीश मरीन एक्सपोर्ट व मौर्य एक्वाक्स या प्रकल्पांना भेट देऊन कोळंबी प्रक्रिया उद्योग आणि समुद्री खाद्यपदार्थांच्या मूल्यवर्धन प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास करण्यात आला.

या भेटीदरम्यान काढणीनंतरचे व्यवस्थापन, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान, उत्पादनाची गुणवत्ता, निर्यातक्षम उत्पादने तयार करण्याच्या पद्धती आणि जागतिक बाजारपेठेतील संधी यांची माहिती घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता राखणे, प्रक्रिया उद्योगांची कार्यक्षमता वाढविणे आणि मूल्यवर्धित समुद्री खाद्यपदार्थांच्या माध्यमातून निर्यातीला चालना देणे यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या कार्यपद्धतींचाही आढावा घेण्यात आला.

त्यानंतर कोवाडा येथील Ananda Advanced Aqua Lab च्या प्रादेशिक संशोधन व विश्लेषण प्रयोगशाळेला भेट देण्यात आली. मत्स्यपालनातील रोगनिदान, पाणी व मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण, कोळंबीच्या आरोग्याचे निरीक्षण आणि शास्त्रोक्त मत्स्यपालन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या वैज्ञानिक चाचण्या व विश्लेषण प्रक्रियेची माहिती घेण्यात आली.

प्रयोगशाळेच्या माध्यमातून रोगांचे वेळेवर निदान, संभाव्य धोके ओळखणे आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यात आला. वैज्ञानिक चाचण्या आणि आकडेवारीवर आधारित निर्णयप्रक्रियेमुळे मत्स्यपालनातील संभाव्य नुकसान कमी करणे, उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि उत्पादकता वाढविणे शक्य होते, यावर यावेळी भर देण्यात आला.

*आंध्र प्रदेशचे यशस्वी मॉडेल महाराष्ट्रात राबविण्यावर भर*

आंध्र प्रदेशच्या यशस्वी मत्स्यव्यवसाय मॉडेलचा महाराष्ट्राच्या गरजांनुसार अवलंब केल्यास राज्यातील मत्स्यव्यावसायिकांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यास मोठी मदत होऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शास्त्रोक्त मत्स्यपालन, पाणी व खाद्य व्यवस्थापन, रोगांचे वेळेवर निदान आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा यांच्या माध्यमातून मत्स्यपालन अधिक कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनविण्याच्या संधी या दौऱ्यातून अधोरेखित झाल्या.

त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगांचा विस्तार, मत्स्य व कोळंबी प्रक्रियेतील उपपदार्थांपासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती, काढणीनंतरचे योग्य व्यवस्थापन आणि निर्यातक्षम उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास महाराष्ट्रात रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला चालना मिळू शकते. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढविण्यास मदत होईल.

बंदर क्षेत्राच्या दृष्टीनेही आधुनिक प्रशिक्षण व्यवस्था, कौशल्यविकास, अत्याधुनिक कार्गो हाताळणी तंत्रज्ञान आणि सुरक्षित कार्यपद्धतींचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरला. वाढवण व दिघी बंदरांसह राज्यातील प्रस्तावित सागरी आणि बंदरविकास प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या दिशेने या दौऱ्यातून महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. श्री. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाधिष्ठित विकास आणि आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आंध्र प्रदेशातील यशस्वी तंत्रज्ञान, संशोधन, व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाच्या कार्यपद्धतींचा महाराष्ट्राच्या परिस्थितीनुसार प्रभावी अवलंब केल्यास मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम आणि रोजगाराभिमुख बनविण्यास मदत होईल.

*आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि सक्षम बंदरव्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला मत्स्यव्यवसाय व सागरी विकास क्षेत्रात अग्रगण्य राज्य बनविण्याच्या दिशेने हा तीन दिवसीय अभ्यास दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा