*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम लेख*
*पाण्याचा एक थेंब मोलाचा*
“या देशाची, देशातील सर्व लोकांची खरोखर काळजी वाटण्याजोगीच स्थिती आहे.
कसं होणार या जनतेचं ?
आपण काय करतोय ?
त्याचे परिणाम काय होणार ?
.. का कळत नाहिये.
पैशाच्या मागे धावणारं,
भविष्याचा विचार न करणारं, आणि फक्त स्वतःसाठी जगणारं हे जग !…
आपली घरं बांधण्यासाठी झाडांवर कुर्हाडीचे घाव घालतात.
उभी झाडे आडवी करतात.
खरं तर झाडे कार्बनवायू घेतात. प्राणवायू आपल्याला देतात. हवेतले प्रदूषण कमी करतात.
किती मोटारी किती स्कूटर्स काळा धूर सोडीत जातात.
ती धूरमिश्रित हवा घेऊनही झाडे आपल्याला उपयोगी प्राणवायू देतात.
“विष प्यायचं अमृत द्यायचं”
असा शंकरबाणा आहे झाडांचा !
पण आज जो तो धावत सुटलाय. वृक्षतोडीचे दुःख कुणालाच नाही. आता सगळीकडे सिमेंटचेच जंगल !
झाडे पावसांना बोलावतात,
झाडांची मुळे पाण्याला धरून ठेवतात.
झाडे तोडून पाणी प्रश्नाचे काय होणार ?
पाणी तर कसेही वापरतो आपण !
हवा पाणी फुकट !
म्हणून त्याचे महत्त्वच नाही वाटत.
पावसाचे पाणी वाहून जाईल.
समुद्रात सगळे मिसळून जाईल.
ते आपणच अडवायला हवे जिरवायला हवे
नाहीतर झाडांपर्यंत ते कसे येईल?
सर्वार्थाने फुलून येणे हा झाडांचा गुणधर्म
पूर्णतेने उपयोगी पडणे हेच त्यांचे कर्म !
पण असे असूनही माणूस एकही फूलझाड लावत नाही की वृक्षही लावत नाही.
वाचवत तर त्याहून नाही.
कसे होणार तुमचे आमचे ? आपल्या पुढील पिढींचे ?
म्हणूनच आपण हा पुढील मंत्र..
प्रत्यक्षात आणायला हवा..
*पाणी वाचवा*
*झाडे जगवा*
निसर्गाची हाक ऐकली नाही तर त्यात आपलेच नुकसान आहे.
आपण आपल्या मुलांकरता, नातवांकरता
बिया पेरून काही तरतूद का करीत नाही ?
झाडे म्हणजे निसर्गधन
झाडे म्हणजे नंदनवन
माणसागणिक एक वृक्ष लावायला हवा.
प्रत्येकाने मनापासून जोपासायला हवा.
निसर्गाचा समतोल राखायला हवा.
‘झाडे लावा झाडे जगवा
मातीची ही धूप थांबवा’
झाडांना तोडणं म्हणजे स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे.
गडकिल्ल्यांवरची तळी,
कातळातले पाणी कसे राखले आहे ?
पाणी नियोजनाचे हे परंपरागत ज्ञान
आपण नीट जाणून घ्यायला हवे आहे.
कारण ..
पाऊस पाणी,
लता वृक्ष वेली आणि झाडे ..
हेच खरे सर्व जीवांचे भाग्यविधाते आहेत.
‘थेंब एक पाण्याचा
लाख लाख मोलाचा’
‘दिवसाचे सारे प्रहर
जीवनाचे सारे बहर,
अवलंबून पाण्यावर’
निदान आता तरी
थांबवायलाच हवा
पाण्याचा अतिवापर.
‘पाण्याचे करू या
जतन आणि संवर्धन
अन्यथा नक्कीच
दुष्काळ अवर्षण’॥
कामात शिस्त नाही.
कुठेही काम चालू करतात.
तसेच अर्धवट सोडून निघून जातात.
ती धूळ हवेत मिसळते. वार्यावर उडते.
वाहनांचा धूर, गिरणीचा धूर याने हवा प्रदूषित होते. तीच हवा श्वासावाटे आपण घेणार.
आपले घर स्वच्छ करून कचरा रस्त्यावर टाकतात. कुत्री फिरवायला नेता.
तीही त्यांनी त्यांचे विधी रस्त्यावर उरकावेत यासाठीच.
कुणालाही देशाच्या स्वच्छतेचा विचार कसा भेडसावत नाहिये.
नियमांचे पालन करताना
कुणीही दिसत नाही.
पर्यायाने त्याचे परिणाम माणसांनाच
भोगावे लागणार आहेत.
जगाच्या अनेक भागामध्ये हवा प्रदूषणाची स्थिती वाईट आहे.
२००५ / ०६ सालच्या सर्वेक्षण पुराव्यानुसार महाराष्ट्रात निम्म्याच्यावर ठिकाणी हवेतील धूलीकण व अपायकारक सूक्ष्म घटकांचं प्रमाण घातक पातळीच्याही वर होतं.
याशिवाय काही ठिकाणी सल्फर डायॅाक्साईड व नायट्रोजनचे विविध ॲाक्साइड्स – या घातक वायूंचं प्रमाणही जास्त आढळून आलं आहे..
त्यामुळे आम्लवर्षा होण्याचा धोका असतो. केवळ २० टक्के ठिकाणची हवाच खरीखुरी शुध्द आढळली आहे !
तर ८० टक्के ठिकाणची हवा प्रदूषित आढळून आली आहे.
माणसांनो..
‘आतातरी जागे होऊ !
प्रत्येकजण मनावर घेऊन काहीतरी उपाय योजू !
ओझोन वायूचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे. त्याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम आत्ताच दिसायला लागले आहेत,
पण कुणीही गांभिर्याने त्याकडे पहात नाहिये.
भूतानला झाडाची पाने तोडायलाही बंदी आहे.. वृक्षतोड तर लांबच !
तसे नियम लागू करून शिस्तशीरपणे
का पाळत नाही कुणी ?
सिंगापूरच्या रस्त्यावरची झाडेसुद्धा किती टवटवीत सदाहरित दिसतात !
नुसतं झाडाकडे पाह्यलं तरी चित्तवृत्ती तरतरीत होऊन जातात.
आपल्याकडे काही रस्त्यांवर तर झाडेच नाहीत.
आहेत तीही धूर धुळीचे थर साठलेली !
रुक्ष जीर्ण कळाहीन दिसणारी !
प्रत्येक नागरिकाची उपभोक्ता म्हणून महत्त्वाची जबाबदारी आहे.
आणि या भूमिकेतून तो पर्यावरणावर आणि प्रदूषणावर ताबा ठेवू शकतो.
उदा.
🔅वाहन आवश्यक असेल तेव्हाच वापरणे. इंधन बचत करणे,
🔅कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावणे,
रस्ते किंवा सार्वजनिक जागेत कचरा न टाकणे,
🔅वनस्पती, प्राणी संवर्धनाच्या सामाजिक कार्यात भाग घेणे.
🔅झाडांचे प्राण्यांचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे.
🔅उद्याने, खेळण्याची मैदाने इ. ठिकाणांचा वापर करण्यास मुलांना उद्युक्त करणे.
🔅अनाठायी रोषणाई टाळणे,
🔅उर्जा इंधन यांचा आवश्यक तेवढाच वापर करणे, विजेच्या खर्चात बचत, पाण्याचा वापर काटकसरीने करणे,
🔅व्यर्थ पाणी वाहून जाऊ नये याची काळजी घेणे, पुनर्भरणाच्या योजना राबविणे, स्वत:बरोबर इतरांनाही तसे वागण्यास प्रवृत्त करणे..
हे सारे प्रत्येकाने अगदी मनापासून करणे..
खूप म्हणजे खूपच आवश्यक आहे.
तरच देशाचे.. पर्यायाने आपले भविष्य भवितव्य ठीक असणार आहे.
बुध्दिमत्तेचे वरदान लाभलेल्या मानवाने स्वत:चे जीवन सुखी बनवण्याच्या हव्यासापोटी विज्ञानाचा वापर करून अनेक सुखसोयी निर्माण करून घेतल्या.
अनेक प्रकल्प विकास योजना राबवल्या पण ते करताना निसर्ग संरक्षणाचा विचार झाला नाही. पर्यायाने विकासाबरोबर ऱ्हासही वाढला. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले. समतोल ढासळू लागला.
हवा, पाणी, निसर्ग यांना जिवापाड जपले नाही तर आपला विनाशकाल जवळ आला आहे असे समजावयास हरकत नाही.
वृक्ष लागवड संवर्धन, जलसंरक्षण, नैसर्गिक संपदांचा योग्य वापर, रासायनिक खते, कीटकनाशके, प्लॅस्टीक पिशव्या इ. अविघटनशील प्रदूषकांच्या वापरावर बंदी घालून पर्यावरण संतुलनाबाबत जनजागृती अतीव गरजेची आहे.
कारण मानवाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तेवढेच उज्ज्वल आणि स्वच्छ पर्यावरण राखणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे.
डोळे उघडून नीट पहा।
आतातरी जागे व्हा ॥
डॅा.शरयू शहा, मुंबई.
9619023330
