घोरपडी (प्रदीप जोशी/ ज्येष्ठ पत्रकार) :
श्रावस्ती बुद्ध विहार, घोरपडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक कार्यावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा हिमाली ताई कांबळे, नगरसेविका घोरपडी होत्या. प्रमुख उपस्थिती बडेकर सर यांची होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नानासाहेब शिरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले. ही माहिती कवयित्री गझलकार निवेदिका कविता काळे यांनी दिली.
त्यांनी दिलेली माहिती अशी : या वेळी प्रा. भालेसाईन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या विविध संस्था व संघटनांची माहिती दिली. यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), समाज समता संघ (१९२७), द बॉम्बे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट (१९४४), भारतीय बौद्ध महासभा (१९५५), डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी (१९२८), पीपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५) तसेच सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद महाविद्यालय यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात आला.
तसेच स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (१९४२) आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाची संकल्पना, ट्रेनिंग स्कूल ऑफ पावर व बॉम्बे शेड्युल्ड कास्ट्स याबाबतही माहिती देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार का केला, बौद्ध धर्माच्या स्वीकारामागील समता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवतेचा विचार, तसेच धर्मांतरानंतर दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रंगूनच्या राजाने दिलेल्या दोन बुद्धमूर्तींपैकी एक मूर्ती देहूगावाला देण्यामागील कारणही स्पष्ट करण्यात आले.
भगवान बुद्धांनी महिलांना संघात प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय, महाप्रजापती गौतमी, खेमा आणि आम्रपाली यांच्या संघप्रवेशाची पार्श्वभूमी तसेच बौद्ध धर्मातील चाफ्याच्या फुलाचे महत्त्व यावरही प्रा. भालेसाईन यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आयोजन श्रावस्ती बुद्ध विहारचे अध्यक्ष आयु. अश्विन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधिर गायकवाड, सतिश सापळे, अजय डंबाळे, अनिकेत सूर्यवंशी, मयंक जगताप, सम्राट सापळे, विजय जगताप, संदीप साबळे अंकुश कुमार व उमेश मोरे यांनी केले.
