दांडी किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला डॉल्फिन
वनविभागाकडून शवविच्छेदन; नगरपालिका व वनविभागाच्या उपस्थितीत किनाऱ्यावरच केले दफन
मालवण
मालवण शहरातील दांडी किनारपट्टीवर रविवारी सकाळी एक डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. मृत डॉल्फिन आढळताच महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी तत्काळ मालवण नगरपालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
आरोग्य अधिकारी संजय पवार यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत डॉल्फिनचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगरपालिका कर्मचारी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने मृत डॉल्फिनला दांडी किनारीच नियमानुसार दफन करण्यात आले.
समुद्रकिनारी समुद्री जीव मृतावस्थेत आढळून आल्यास नागरिक व मच्छीमारांनी तात्काळ संबंधित विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
