दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रकल्प ठरणार महत्त्वाचा केंद्रबिंदू
पालकमंत्री नितेश राणे यांची नाविण्यपुर्ण संकल्पना; प्रकल्पामुळे वैभवाडीच्या वैभवात पडणार भर
वैभववाडी / प्रतिनिधी :
निसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) आचिर्णे येथे साकारण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष म्हणूनही नितेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आचिर्णे येथे सुमारे अडीच एकर क्षेत्रात हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, तळकोकणातील विविध औषधी वनस्पतींची माहिती नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उद्यानात दुर्मिळ आणि उपयुक्त औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार असून, त्यासोबतच पर्यटक, अभ्यासक आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध वनस्पतींची ओळख, त्यांचे संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तळकोकणातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील संशोधक, शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांना या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे वैभववाडी तालुक्याच्या पर्यटन, पर्यावरण आणि शैक्षणिक विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
वैभववाडी तालुक्यात अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण प्रकल्प मंजूर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या प्रकल्पामुळे वैभववाडीच्या वैभवात भर पडण्याबरोबरच तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) चे भूमिपूजन लवकरच कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
