शेतकरीनिहाय व बारमाही पीक विमा लागू करा; रुफिंगसाठी १०० टक्के अनुदान देण्याची किसान मोर्चाची मागणी
विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, मांजर्डे आणि सावळज सर्कलमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बजाज कंपनीकडून केवळ ४०० रुपये प्रति गुंठा या प्रमाणात मदत देण्यात आली आहे. ही मदत अपुरी असून ती १२०० रुपये प्रति गुंठा या प्रमाणात देण्यात यावी, अशी मागणी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
याबाबतचे निवेदन अपर जिल्हाधिकारी शिवाजी जगताप व जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांना शिष्टमंडळाने दिले.
द्राक्ष पीक विमा योजनेतील सध्याच्या पद्धतीमुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित संरक्षण मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्कलनिहाय विम्याऐवजी वैयक्तिक शेतकरीनिहाय पीक विमा योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक गावात किमान सहा पर्जन्यमापक बसवावेत, द्राक्ष पीक विमा योजना बारमाही करावी आणि केवळ ठरावीक निकषांपुरते नुकसान मर्यादित न ठेवता अतिवृष्टी, अवेळी पाऊस, आर्द्रता, दुष्काळ, बाग कोसळणे, रोगराईमुळे होणारे नुकसान आदी सर्व प्रकारच्या नुकसानीचा विमा संरक्षणात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्लोबल वॉर्मिंगचा द्राक्ष शेतीला मोठा फटका
सांगली जिल्हा हा देशातील महत्त्वाच्या द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांपैकी एक आहे. मात्र, ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेतीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. कधीही पाऊस, कधीही दुष्काळ, तापमानातील अचानक बदल, वाढती आर्द्रता आणि रोगराई यामुळे द्राक्ष उत्पादकांचा उत्पादन खर्च आणि जोखीम वाढत आहे.
द्राक्ष शेतीला हवामानातील बदलांपासून संरक्षण देण्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक पीक विमा योजना आवश्यक आहे. विमा योजनेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या नुकसानीचा विचार होऊन त्याला वेळेत आणि पुरेशी भरपाई मिळाली, तरच द्राक्ष शेती टिकवणे शक्य होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
रुफिंगसाठी १०० टक्के अनुदान द्या
बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागांचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण बागेसाठी रुफिंग उभारण्यास १०० टक्के अनुदान देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानापासून बागांचे संरक्षण करण्यासाठी रुफिंग महत्त्वाचे ठरत असल्याने शासनाने याबाबत विशेष धोरण आखावे, अशी मागणी करण्यात आली.
द्राक्ष उत्पादकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विमा योजनेतील त्रुटी तातडीने दूर करून शेतकरीनिहाय, बारमाही आणि सर्व प्रकारच्या हवामान जोखमींचा समावेश असलेली द्राक्ष पीक विमा योजना लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या शिष्टमंडळात किसान मोर्चाचे पदाधिकारी किसान मोर्चा कोषाध्यक्ष इंद्रनील पाटील, कार्यकारिणी सदस्य संदीप जाधव, सरचिटणीस प्रदीप कार्वेकर, संयोजक अग्रीकोज प्रमोद निकम, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आझम मकानदार, अजित शिंदे, प्रदीप निकम, दगडू माळी, कुमार माळी, विजय शिंदे, युवराज माळी व द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
