You are currently viewing सावंतवाडी नगरपालिका दवाखाना सुरूच राहणार

सावंतवाडी नगरपालिका दवाखाना सुरूच राहणार

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणी; नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा होणार पूर्ववत

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचा दवाखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये, यासाठी नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी घेतलेल्या पुढाकाराला यश आले आहे. तसेच आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही यासाठी प्रयत्न केले. नगराध्यक्षांच्या मागणी पत्राच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी आणि त्यांच्या पथकाने आज नगरपालिका दवाखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

येत्या चार दिवसांत दवाखान्यासाठी डॉक्टरांसह पूर्ण वैद्यकीय पथक उपलब्ध करून दिले जाणार असून, येत्या सोमवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.

सावंतवाडी येथे सध्या सुरू असलेले ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ नगरपालिका दवाखान्यातून चालविण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपालिका दवाखान्यातील आरोग्य सेवा पूर्ववत सुरू होऊन शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी नगरपालिका दवाखाना नियमितपणे सुरू राहावा आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मागणीला आरोग्य विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दवाखाना सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सिद्धार्थ भांबुरे, देवा टेमकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा