You are currently viewing कोकणच्या मातीपासून मनापर्यंतचा प्रवास ‘गमन’

कोकणच्या मातीपासून मनापर्यंतचा प्रवास ‘गमन’

*नाईक साटम आर्ट्स निर्मित मराठी चित्रपट २ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत*

मुंबई (मिलिंद मिरजकर) : कधीकाळी ज्या घरांच्या अंगणात माणसांची गर्दी असायची, तिथे आज शांतता आहे. ज्या शाळांच्या आवारात मुलांचा किलबिलाट घुमायचा, तिथे आता निवांत वारा फिरतो. पिढ्यान्‌पिढ्या माणसं घडवणारी कोकणची माती आज आपल्या माणसांच्या परतीची वाट पाहत आहे. रोजगाराच्या शोधात झालेल्या स्थलांतरामुळे गावागावांतील घरं ओस पडत गेली. याच सामाजिक वास्तवाला माणसांच्या भावविश्वातून पडद्यावर मांडणारा नाईक साटम आर्ट्स निर्मित ‘गमन’ हा मराठी चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

कोकण म्हटलं की हिरवाईने नटलेला निसर्ग, लाल मातीच्या वाटा, कौलारू घरं, अंगणातील जिव्हाळा आणि सणासुदीला गजबजणारा गोतावळा डोळ्यांसमोर येतो. मात्र, या रम्य परिसराच्या अंतःकरणात स्थलांतराची वेदनाही रुजली आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षांत कोकणातील अनेक कुटुंबांनी रोजगारासाठी मुंबईची वाट धरली. पुढच्या पिढ्या मुंबईत स्थिरावल्या, तर त्यानंतरची पिढी शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने परदेशात पोहोचली. या प्रवासात मागे राहिली ती ओस पडलेली घरं, शांत झालेली अंगणं आणि आपल्या माणसांची वाट पाहणारी माती.

याच सामाजिक विरोधाभासातून ‘गमन’च्या कथेचे बीज रुजल्याचे लेखक-दिग्दर्शक मनोज नाईक साटम सांगतात. एका बाजूला कोकण रिकामे होत गेले, तर दुसऱ्या बाजूला मुंबईवर वाढत्या स्थलांतराचा ताण वाढत गेला. ‘गमन’ हे नावही साधे आणि अर्थपूर्ण आहे. या तीन अक्षरांत कोकणातून शहरांकडे निघालेल्या असंख्य पावलांचा प्रवास सामावलेला आहे. चित्रपटात कोकणातील एका गावात राहणारे वृद्ध दांपत्य भाऊ आणि माई किरकोळ वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आपल्या मुलांकडे येते. गावच्या मोकळ्या वातावरणात आणि माणसांच्या सहवासात जगलेल्या या दांपत्याला शहरातील धावपळीशी जुळवून घेणे कठीण जाते. त्याच काळात उत्तर प्रदेशातील पुरामुळे घर गमावलेले कुंदन आणि तारा हे बहिण-भाऊ रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. कुंदनला भाऊंच्या मुलाच्या खानपान व्यवसायात काम मिळते. गणेशोत्सवासाठी भाऊ-माई गावाकडे परतण्याचा निर्णय घेतात आणि कुंदन-तारा त्यांच्यासोबत गावात जातात.

चार माणसं, चार वेगवेगळ्या वाटा; मात्र गावच्या मातीच्या सहवासातून त्यांच्या नात्याला नवी ऊब मिळते. रक्ताची नाती नसतानाही माणुसकीची नाळ कशी जुळते, हा या कथानकाचा महत्त्वाचा धागा आहे. दीपक कुमार आणि हर्षीका मेळेकर यांनी कुंदन आणि तारा यांच्या भूमिका साकारल्या आहेत. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या बहिण-भावाचा संघर्ष, त्यांची निरागसता आणि भाऊ-माईंबरोबर निर्माण होणारा जिव्हाळा त्यांनी अभिनयातून मांडला आहे. नारायण जाधव आणि श्रद्धा खानोलकर यांच्या प्रमुख भूमिका कोकणी माणसाचा साधेपणा, मातीशी असलेली नाळ आणि एकटेपणाची वेदना अधोरेखित करतात.

‘गमन’च्या दृश्यविश्वाला छायाचित्रकार शैलेश तांबे यांच्या छायाचित्रणाची साथ लाभली आहे. कोकणचा हिरवा निसर्ग, लाल मातीच्या वाटा, जुन्या घरांची शांतता, गावातील उत्सवी वातावरण आणि माणसांच्या चेहऱ्यांवरील भावछटा कॅमेऱ्यात टिपण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी एकत्र आलेले कुटुंब, पुन्हा भरून गेलेले घर आणि अंगणातील आनंद या दृश्यांमधून ‘घर’ या शब्दाचा भावार्थ उलगडतो. निर्माती मानसी नाईकसाटम यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास अभिनय कार्यशाळेपासून सुरू झाला. सामाजिक भान जपणारे, सकारात्मक विचारांना चालना देणारे आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे चित्रपट निर्माण व्हावेत, हा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यातूनच आशयकेंद्रित ‘गमन’ आकाराला आला आहे.

चित्रपटाचा शेवट उलगडून न सांगता त्यातील भावनिक पदर मात्र जाणीवपूर्वक अबाधित ठेवण्यात आले आहेत. काही शेवट सांगण्यापेक्षा पडद्यावर अनुभवणे अधिक परिणामकारक ठरते. ‘गमन’ हा केवळ कोकणातून मुंबईकडे झालेल्या स्थलांतराचा चित्रपट नसून मातीपासून दूर गेलेल्या माणसांचा, मागे राहिलेल्या घरांचा, विरहाचा आणि माणुसकीच्या नात्यांचा प्रवास आहे. नाईक साटम आर्ट्स निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक मनोज नाईक साटम यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट २ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा