You are currently viewing कृषी तंत्र विद्यालात साहित्यसम्राटचे २३० वे कविसंमेलन रंगले

कृषी तंत्र विद्यालात साहित्यसम्राटचे २३० वे कविसंमेलन रंगले

पुणे :

निर्मिती मिडिया सोलुशन आणि समाज विकास संस्था मांजरी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव पुरस्कार सोहळा कृषी तंत्र विद्यालय मांजरी फार्म पुणे येथे आयोजित केला होता.

माजी आमदार गजानन बापू शेवाळे,प्राचार्य अमित पवार सर, महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या स्मिताताई वाघ, रतन माळी, सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलकर्णी, बाळासाहेब विभुते, मुख्य आयोजक देविदास झुरंगे, संपादक शिवराम कांबळे आणि साहित्यसम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ मंचावर उपस्थित होते.

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते फु बाई फु फेम माननीय विकास समुद्रे अर्थात दादुस यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षण चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांच्या साहित्यसम्राट संस्थेचे २३० वे कवी संमेलन कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य अमित पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. कवी संमेलनामध्ये शेत, जमीन, शेतकरी, आत्महत्या, वृक्ष,पशुपक्षी, पाणी, जीवन, माणुसकी, प्रेम, विद्रोह, प्रबोधन अशा अनेक विषयावरील हास्यमैफलीच्या वातावरणात हे कवी संमेलन रसिकांची मने जिंकणारे ठरले.

कवी संमेलनामध्ये कवी जयद्रथ आखाडे माणसांना जगण्याची आणि वेळेची किंमत समजावून देणाऱ्या सामाजिक संदेशाच्या कवितेत म्हणतात

अरे माणसा तू जगलास तरी किती

एवढे जगून गड्या केलस तरी काय

निसर्गाच्या सानिध्यात श्रावणाच्या सरी अनुभवताना श्रीकांत वाघ आपल्या कवितेतून सांगतात

धुंद धुंद पावसात या चला भिजायला

गार गार गारव्यात जावू चला फिरायला

गणेश पुंडे स्वच्छतेचे महत्व पटवून देत देशसेवा करण्याचे आवाहन आपल्या कवितेतून करताना म्हणतात

सुंदर भारत देश आपला ठेवू तयाचे भान

त्यांना मनातून चला राबवू स्वच्छता अभियान

निसर्गाची शपथ या कवितेत भरभरून देणाऱ्या सृष्टीला वंदन करताना रेखा दुसाने म्हणतात

डोंगर दऱ्या झाडांची छाया

निसर्ग म्हणजे जीवन माया

श्रीकृष्णावरील प्रेमगीत सादर करताना शांतीलाल ननावरे आपल्या काव्यातून म्हणतात

कृष्ण सखया माझ्या मी तुझीच रे प्रिया

जिव माझा रे प्रियकरा तुझ्यावर जडला

माझं सुंदर रान या निसर्ग कवितेत तानाजी शिंदे पशुपक्ष्यांचे जीवन दाखवताना म्हणतात

रानीवनी उंच झाडे डोलतात

त्यावर चिमण्या घरटं बांधतात

संपादक शिवराम कांबळे आपल्या कवितेतून वास्तववादी विचार मांडताना म्हणतात

मी नाही तसा दिसावे लागते कधी कधी

कंठात आग रोखून हसावे लागते कधी कधी

आणि शेवटी विनोद अष्टुळ यांनी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या काव्य बोले काळजाला या उपक्रमाची ओळख करून देताना विनोदातून प्रबोधन करणारी सुप्रसिद्ध सुराज्य ही वीररस कविता सादर करून सभागृहाची वाहवा मिळवली. ते शब्द होते

किल्ल्यासारखी असायची गवताचीसुद्धा काडी

भरदिवसा फाडली जाते आया बहिणींची साडी

म्हणून राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे

शीर आमचे छाटून सुराज्य स्थापावे

अशाप्रकारे उपस्थित सर्व सुप्रसिद्ध कवी – कवयित्री रूपाली पाटील, सुनिता घोडके, अरुण घोडके, प्रा.गौरव नेवसे, स्नेहा भोसले, प्रथमेश कोळी, प्रा.अमित पवार आणि कृषी विद्यापीठातील अनेक विद्यार्थिनी तसेच प्राध्यापिका यांनी कवी संमेलनामध्ये उत्स्फूर्त कविता सादर करून उपस्थितांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळवली. सर्वांचा सन्मान अभिनेते विकास समुद्रे दादूस यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार मुख्य आयोजक शिवराम कांबळे यांनी तर कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा