You are currently viewing दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला आपत्कालीन निधीतून नुकसान भरपाई व्यतिरिक्त आर्थिक मदत म्हणून हेक्टरी रू ५०००० मदत करावी-भारतीय किसान संघ

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला आपत्कालीन निधीतून नुकसान भरपाई व्यतिरिक्त आर्थिक मदत म्हणून हेक्टरी रू ५०००० मदत करावी-भारतीय किसान संघ

*दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला आपत्कालीन निधीतून नुकसान भरपाई व्यतिरिक्त आर्थिक मदत म्हणून हेक्टरी रू ५०००० मदत करावी-भारतीय किसान संघ*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे संपूर्ण भांडवली व उत्पादन खर्च बुडाल्याने त्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी तसेच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे व खते विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय किसान संघाने सोमवारी सावंतवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून एका निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.
याबाबत भारतीय किसान संघाने सोमवारी राज्यभरात तालुका स्तरावर मोर्चे काढून तहसीलदारांना  दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यावर्षी पावसाचे अत्यल्प व अत्यंत असमान वितरण झाले असून अनेक भागात पावसाचे दीर्घ खंड पडले आहे. कोकणासह राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये खरीपाची पिके पावसा अभावी करपून गेली आहेत. आजची परिस्थिती केवळ पीक उत्पादनातील घट एवढ्या पूर्ती मर्यादित राहिलेली नसून, शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी जमीन मशागत, बियाणे, खते, औषधी, मजुरी, सिंचन, फवारणी यंत्रसामग्री व इतर निविष्ठांवर केलेला संपूर्ण खर्च प्रत्यक्ष उत्पादन न मिळाल्यामुळे बुडाला आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांपुढे रब्बी हंगामासाठी भांडवल उरलेले नसून अशा परिस्थितीत केवळ नेहमीच्या निकषानुसार मिळणारी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही.
यावेळी भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग हळदणकर म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बुडालेल्या भांडवलासाठी हेक्टरी ५० हजार तातडीची आकस्मित निधीतून आर्थिक मदत करणे गरजेचे असून खरीप हंगामातील पिकांचे प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन आपातकालीन आकस्मित निधीतून तातडीने विशेष आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट डीबीटी पद्धतीने जमा करण्यात यावी. सदर मुदत केवळ पारंपारिक नुकसानभरपाई म्हणून न देता शेतकऱ्यांनी खरीप हंगामात केलेल्या प्रत्यक्ष उत्पादन खर्चाची भरपाई करण्याच्या उद्देशाने विशेष पॅकेज म्हणून देण्यात यावी. याव्यतिरिक्त रीतसर पिकानुसार भरपाई द्यावी.
जिल्हा मंत्री अभय भिडे म्हणाले, खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे रब्बीची पेरणी करण्यासाठी आर्थिक क्षमता राहिलेली नाही म्हणून बियाणे रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व आवश्यक कृषीनिविष्ठा यांचा विनामूल्य पुरवठा करण्यात यावा. रब्बीची पेरणी करण्याची वेळ निघून जाण्यापूर्वी ही निविष्ठा शेतकऱ्यांच्या गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय पंचनामाच्या विलंबामुळे रखडू नये तसेच पीक नुकसानीचे पंचनामे आवश्यक असले तरी पंचनाम्याच्या प्रशासकीय प्रक्रिये मुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यास उशीर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
जिल्हा सहमंत्री मनोहर ठिकार म्हणाले, पिक विमा नुकसान भरपाई ची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. शेतकऱ्यांच्या कर्जा बाबत तातडीची उपाय योजना करणे आवश्यक असून खरीप हंगामातील उत्पादन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यामुळे परतफेड क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुली ला स्थगिती ,कर्जाचे पुनर्गठन, नवीन रब्बी पीक कर्ज उपलब्ध करून देणे तसेच पीक कर्जावर यापुढे आपत्ती काळ संपेपर्यंत व्याज आकारणीस स्थगिती देण्यात यावी याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.
कर्जमाफी योजनेतील प्रोत्साहन अनुदान, नियमित, थकीत, अशा सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपये देण्यात यावेत मात्र हे कार्य संथ गतीने सुरू आहे ही खेदाची बाब आहे. दुसऱ्या टप्प्यातील उपाययोजना सध्याची परिस्थिती पुढील काळात अधिक गंभीर होत गेल्यास शासनाने परिस्थितीच्या तीव्रते नुसार उपाययोजना टप्प्याटप्प्याने लागू कराव्यात. खरिपातील बुडालेल्या खर्चासाठी तातडीची आर्थिक मदत, रब्बी हंगामा साठी बियाणे व खते विनामूल्य, पिण्याचे पाणी व पशुधनासाठी चारा बहुवार्षिक फळ बागांच्या जतनासाठी धरण साठ्यातील पाण्याची विशेष राखीव तरतूद असावी.
दरम्यान सणासुदीचे दिवस सुरू झाले असून अल्प वृष्टी मुळे शेतकरी मात्र पुरता निर्धन झाला आहे. शेतकरी हा राज्याच्या अन्नसुरक्षेचा आधार आहे त्याने उत्पादन घेण्यासाठी केलेले भांडवल व श्रम नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झाले असतील तर त्याला केवळ सहानुभूतीची नव्हे तर तातडीच्या आणि परिणामकारक आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.  शेतकऱ्यांना मदत करताना लालफितीच्या कारभारात हे मदत कार्य रखडणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग हळदणकर, जिल्हा मंत्री अभय भिडे, जिल्हा सहमंत्री मनोहर ठिकार, जिल्हा कार्यकारणी सदस्य सखाराम नाईक, प्रवीण परब, ग्राम समिती पदाधिकारी मुकेश ठाकूर, रुपेश परब, अभिजीत सावंत, चंद्रकांत सावंत, प्रशांत कांबळी, देविदास गवंडे, रूपा सावंत, पुरुषोत्तम कासार व विविध गावातील ग्रामसमितीचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा