मुक्ताई ॲकेडमीच्या पाच बुद्धिबळपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
साक्षी रामदूरकर, गार्गी सावंतसह आहना पालव, चिदानंद रेडकर व लिएण्डर पिंटोची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी
कणकवली :
जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या पाच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विभागस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. साक्षी रामदूरकर, गार्गी सावंत, आहना पालव, चिदानंद रेडकर आणि लिएण्डर पिंटो यांनी आपल्या गटात उल्लेखनीय यश मिळविले. सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी या पाचही खेळाडूंची निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने कणकवली येथे ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या खेळाडूंनी नियोजनबद्ध आणि कौशल्यपूर्ण खेळ करत आपली छाप पाडली.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात साक्षी रामदूरकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, साक्षीची विभागस्तरीय स्पर्धेसाठी सलग पाचव्यांदा निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर कॅरममध्येही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साक्षीने बुद्धिबळातही आपले सातत्य कायम राखले आहे.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू गार्गी सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. सलग तीन वर्षे विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरत गार्गीने आपल्या गटातील सातत्यपूर्ण कामगिरी अधोरेखित केली आहे.
कुडाळ येथील आहना पालव हिने पहिल्याच जिल्हास्तरीय सहभागात १४ वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात लिएण्डर पिंटो यानेही पहिल्याच प्रयत्नात द्वितीय क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू चिदानंद रेडकर याने याच गटात तृतीय क्रमांक मिळविला.
दहा वर्षांची यशस्वी वाटचाल
मुक्ताई ॲकेडमीने गेल्या दहा वर्षांपासून शालेय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. विभागीय तसेच राज्यस्तरावर ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले असून, बुद्धिबळ क्षेत्रात ॲकेडमीने कोकणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
या यशासाठी ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर तसेच राष्ट्रीय बुद्धिबळपटू व प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे ॲकेडमीकडून सांगण्यात आले.
ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ. स्नेहा पेडणेकर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी आणि विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
