फोंडाघाटात लोखंडी रॉडने डोक्यात प्रहार; उपचारादरम्यान ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
फोंडेकरवाडीतील घटना; संशयित विष्णू तळेकर पोलिसांच्या ताब्यात, कणकवली पोलिसांकडून तपास
फोंडाघाट | प्रतिनिधी :
फोंडेकरवाडी येथे लोखंडी रॉडने डोक्यात जोरदार प्रहार केल्याने गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर (५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी संशयित आरोपी विष्णू यशवंत तळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत फोंडेकर आणि विष्णू तळेकर हे दोघेही दारू पिण्यासाठी एकत्र बसत असत. रविवारी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास भिकाजी फोंडेकर हे त्यांचे काका सूर्यकांत यांच्या घरी गेले असता सूर्यकांत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यावेळी विष्णू तळेकर हा घटनास्थळी उपस्थित होता.
भिकाजी यांनी विष्णू याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता, सूर्यकांत यांनी शिवीगाळ केल्याने आपण त्यांना मारहाण केल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच सूर्यकांत यांना विचारले असता, विष्णू तळेकर याने मारहाण केल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांकडे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर भिकाजी यांनी आरडाओरड करून स्थानिकांना जमा केले. जखमी सूर्यकांत यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कणकवली येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भिकाजी फोंडेकर यांच्या फिर्यादीनुसार विष्णू यशवंत तळेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३५२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
