You are currently viewing १६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन थेट शेतीच्या बांधावर
Oplus_16908288

१६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन थेट शेतीच्या बांधावर

विदर्भातील ज्येष्ठ शेती साहित्यिक मा. प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतीची आर्थिक दुर्दशा थांबवून लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २५, २६ आणि २७, डिसेंबर २०२६ रोजी अ‍ॅग्रीसन FPC परिसर, आर्वी छोटी शिवार ता. हिंगणघाट जि. वर्धा येथे ३ दिवसीय १६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली आहे.

युगात्मा शरद जोशी यांचे शेतीकेंद्रीय अर्थशास्त्र आणि वैचारिक वारसा जतन करून शेती अर्थशास्त्राला प्रतिबिंबित करणारे साहित्यिक निर्माण व्हावे, यासाठी शेती अर्थ प्रबोधिनी द्वारा वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. त्याच उपक्रम शृंखलेची एक कडी म्हणून ३ दिवस चालणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनात विविध विषयावरील चर्चासत्र, संवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन, गझल मुशायरा आदी कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध रीतीने आयोजित केले जाणार आहेत.

शेती विषय मध्यवर्ती मानून शेतीकेंद्रित शेतीसाहित्याची गुंफण करणारी साहित्यनिर्मिती व्हावी यासाठी राज्याच्या विविध भागात संमेलन आयोजित करण्याच्या प्रयत्नातील हे १६ वे संमेलन आहे. प्रत्यक्ष शेती-मातीची सृजनशील अनुभूति सृजकांना व्हावी म्हणून यंदाचे १६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा जिल्ह्यातील (ता. हिंगणघाट) आर्वी (छोटी) शिवारात आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ शेती साहित्यिक तथा लोकप्रिय कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे गंगाधर मुटे यांनी कळवले आहे.

दीपप्रज्वलन, मराठी गौरवगीत आणि शेतकरी नमनगीताने सुरुवात होणाऱ्या उद्‍घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्यद्वय ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित प्रमुख अतिथी म्हणून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रमोद मुनघाटे प्रमुख पाहुणे म्हणून तर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार सरोजताई काशीकर, अ‍ॅड वामनराव चटप उपस्थित राहणार आहेत. शिक्षण क्षेत्रात सर्वपरिचित असलेले तथा सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले डॉ. अनिलकुमार जवादे स्वागताध्यक्षाची जबाबदारी पार पाडणार आहेत. शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.

३ दिवस चालणाऱ्या संमेलनाच्या आयोजनाकरिता विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून मा. दिलीप भोयर (अमरावती), अ‍ॅड सतीश बोरुळकर (मुंबई), उपेंद्र महात्मे (कळमेश्वर ), जयंत बापट (यवतमाळ), रमेश खांडेभराड (जालना), सुनील बावणे (चंद्रपूर), राजेंद्र फंड (अहिल्यानगर), प्रवीण आडेकर भद्रावती), डॉ. मनीषा रिठे, मधुसूदन हरणे, प्रतिभा काळे, दिलीप देवतळे, गणेश मुटे, प्रकाश गोटे, सारंग दरणे, भारत पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश सातोकर, नरेंद्र गंधारे, सुरेश सुरजुसे, रंगनाथ तालवटकर, नीलकंठ घवघवे, अरविंद बोरकर, रविंद्र खोडे, मुकुंद खोडे, गजानन जिकार, दत्ता राऊत, ज्ञानेश्वर चौधरी, मधुसूदन धारकर, विद्यानंद हाडके, गिरधर काचोळे, नारायण निखाते, प्रशांत झिलपे, सचिन कांबळे, प्रवीण पोहाणे, मुकेश धाडवे, विनोद काळे, निखिल खातबागे, शिवम मुटे, सतीश मानकर, जया कोपरकर, विवेक मुटे यांचा विविध समित्यामध्ये समावेश आहे.

मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी धारण केलेले विक्राळरूप, यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे उत्पादनात येणारी प्रचंड घट, शेतमालाच्या पडत्या बाजारभावामुळे व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे डबघाईस आलेले शेतीचे अर्थशास्त्र, मागील पाच वर्षांपासून सततची नापिकी, कधी चक्रभुंगा तर कधी बोंडसड, कधी कपाशीवर बोंडअळी तर कधी तुरीवर मर रोग यामुळे शेतीतील उत्पन्नासोबतच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे. अशा बिकट स्थितीतही “रोजचेच मढे, त्याला कोण रडे” अशा निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय व प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे त्यामुळे वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होताना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना शोधण्याऐवजी शेतकर्‍यांना थातुर-मातुर अनुदानाच्या योजनांचे गाजर दाखवून बोळवण केली जात आहे.

समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यावासायाचे फार मोठे शल्य आहे. गेल्या २०-२५ वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले नाही. शेतीच्या वास्तवतेवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतीच्या दुर्दशेच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ पासून वर्धा, नागपूर, गडचिरोली, मुंबई, पैठण, अलिबाग, रावेरी, मोहाडी, जयसिंगपूर, महाबळेश्वर अशा विविध ठिकाणी यशस्वीरीत्या १५ संमेलने पार पडली आहेत आणि पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेला बोलते, लिहिते व वाचते करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकरी साहित्य चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन साहित्यिकांची नवीन पिढी अभ्यासपूर्ण वास्तवचित्र आक्रमक आणि सडेतोडपणे रेखाटायला लागली आहे.

प्रत्यक्ष शेताच्या बांधावर होणाऱ्या या १६ व्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

या संमेलनात “शेती, शेतकरी आणि प्रसारमाध्यम” “शेतीत थांबावं की बाहेर पडावं?” “शेतीसाहित्य आणि मानसिक गुलामगिरी” “मुख्य प्रवाहातील साहित्यात कृषीजन साहित्याचे अस्तित्व” “अक्षरांना ‘एआय’ पंख: तंत्रज्ञानाच्या सानिध्यात वाङ्मयीन वाटचाल” इत्यादि विषयावर परिसंवाद होणार असून उदघाटन सत्र, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा, कथाकथन असे विविधांगी सत्र असणार आहेत . या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत. तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा