You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; भात नुकसानीची पाहणी
Oplus_16908288

पालकमंत्री नितेश राणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; भात नुकसानीची पाहणी

*मळगाव, होडावडा येथे विहीर, नदीच्या पाणीपातळीची पाहणी*

*शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतली कैफियत; शेतकऱ्यांना सर्वांगीण मदतीचा दिला विश्वास*

*पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना पालकमंत्री राणे यांचे निर्देश*

सावंतवाडी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. मळगाव येथे भातशेतीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या नुकसानीचा योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन शेतकऱ्यांसाठी काम करत असून, दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्यात येईल, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. ‘ट्रिगर-१’च्या माध्यमातून दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री राणे यांनी शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तसेच नदीच्या पाणीपातळीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाण्याची उपलब्धता आणि शेतीवरील परिणाम याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भातशेती अपेक्षितपणे वाढलेली नसल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक ठिकाणी भाताला अपेक्षित फुटवे आले नाहीत. त्यामुळे भाताचा ‘अवा’ अपेक्षित प्रमाणात वाढला नसून आता पसवण्याची शक्यताही कमी झाली आहे. काही ठिकाणी पसवलेला भातही दाणा भरण्याच्या स्थितीत नसल्याचे पाहणीत आढळून आले.

पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील भात पिकावर गंभीर परिणाम झाला असून काही भागात भातपीक करपले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी दुष्काळाची प्रथम स्थिती अर्थात ‘ट्रिगर-१’ जाहीर केली आहे.

‘ट्रिगर-१’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या सवलती शेतकऱ्यांना प्राधान्याने आणि तातडीने मिळाव्यात, तसेच पीक नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, लघू पाटबंधारेचे संतोष शिरोडकर, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अधिकारी सुदेश राणे यांच्यासह अन्य अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा