You are currently viewing रब्बी हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे

रब्बी हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान सन 2026-27 अंतर्गत रब्बी हंगाममध्ये सांगली जिल्ह्यात पीक प्रात्यक्षिक, प्रमाणित बियाणे वितरण आणि ऊस सुपर केन नर्सरी या घटकांसाठी अनुदानावर बियाणे व निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त ऑनलाइन अर्जांमधून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार करण्यात येणार असून, संबंधित घटकांच्या टाईल्स महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

पीक प्रात्यक्षिक या घटकांतर्गत हरभरा पिकासाठी १४० हेक्टर, ज्वारीसाठी १ हजार ८८० हेक्टर, ऊस आंतरपिक हरभऱ्यासाठी ३१७ हेक्टर आणि पाचट व खोडवा व्यवस्थापनासाठी ४० हेक्टर क्षेत्राचा लक्षांक आहे. या घटकाचा लाभ शेतकरी गटांना देण्यात येणार असून, मार्गदर्शक सूचनांनुसार पिकनिहाय उच्चतम अनुदान मर्यादेत, १० हेक्टर प्रति प्रकल्प या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.

प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत हरभरा पिकासाठी एकूण ९३३ क्विंटल लक्षांक आहे. यामध्ये ५ वर्षांच्या आतील वाणांसाठी ५१३ क्विंटल लक्षांक असून, त्यासाठी बियाण्याच्या किंमतीच्या ७५ टक्के किंवा ६ हजार रुपये प्रति क्विंटल यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येईल. तसेच १० वर्षांच्या आतील वाणांसाठी ४२० क्विंटल लक्षांक असून, बियाण्याच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा ४ हजार रुपये प्रति क्विंटल यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.

ज्वारी पिकासाठी १० वर्षांच्या आतील वाणांचा २ हजार ७९० क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणांचे २ हजार ७१० क्विंटल लक्षांक आहे. १० वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्याच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा ३ हजार रुपये प्रति क्विंटल यापैकी जे कमी असेल तेवढे, तर १० वर्षांवरील वाणांसाठी बियाण्याच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. मक्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणांचे ३४२ क्विंटल लक्षांक असून, त्यासाठी बियाण्याच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा १० हजार रुपये प्रति क्विंटल यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

सुपर केन नर्सरी या घटकांतर्गत ऊस पिकासाठी ११ नर्सरींचा लक्षांक असून, किंमतीच्या ५० टक्के किंवा १० हजार रुपये प्रति हेक्टर क्षेत्रासाठी आवश्यक रोपांकरीता यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. या घटकाचा लाभ शेतकरी गट तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे Agristack क्रमांक असणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित घटकाचा एकदा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याच घटकासाठी पुढील दोन वर्षे लाभ घेता येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील घटकांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक संख्येने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा