ईश्वरपूर / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांसाठी राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची दखल घेण्यात आली आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्या वतीने कारखान्याला ‘अवार्ड फॉर कोऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन हाय रिकव्हरी एरिया’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
भारत सरकारच्या मुख्य साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पत्राद्वारे कारखान्यास याबाबत कळविले आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील इंच न इंच जमीन ओलीताखाली आणण्याचे स्वप्न पाहून कामाला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर हे अपुरे राहिलेले काम माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी पुढे नेले.
कारखान्याच्या माध्यमातून ३८ सहकारी पाणीपुरवठा संस्था उभारण्यात आल्या. तसेच राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून वाळवा तालुक्यात एक हजारांहून अधिक बोअर घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यात आली. गावोगावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठीही ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात आले.
ऊस उत्पादक सभासदांच्या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. ठिबक सिंचन, सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली, शेतकऱ्यांच्या बांधावर शुद्ध बियाणे व रोपे पोहोचविणे आदी योजना ना नफा ना तोटा तत्त्वावर राबविण्यात येत आहेत.
कारखान्याने ड्रोनद्वारे औषध फवारणीची सुविधा सुरू केली असून, अद्ययावत मल्टीस्पेक्ट्रम ड्रोन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘राजारामबापू ऊस भूषण’ पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जाते.
ऊस उत्पादक शेतकरी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमाही उतरविण्यात आला आहे.
गेल्या ४० ते ४५ वर्षांत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम व योजनांचा विचार करून हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
“हा पुरस्कार आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांना केंद्रबिंदू मानून कारखान्याने केलेल्या कामाची ही फलश्रुती आहे. यामध्ये कारखान्याचे संचालक, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, अधिकारी व कामगारांचे योगदान मोलाचे आहे,” अशी प्रतिक्रिया राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी दिली.
