You are currently viewing भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर माहिती द्यावी : सहाय्यक आयुक्त रा. अ. समुद्रे

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर माहिती द्यावी : सहाय्यक आयुक्त रा. अ. समुद्रे

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयामार्फत अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा आदि अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ग्राहकांनीही सतर्क रहावे व कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी परिमंडळ-1 रा. अ. समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी करण्यात येत असून वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये दि. 1 एप्रिल 2026 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत अन्न व्यावसायिकांच्या एकूण 543 तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 392 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तपासणीच्या अनुषंगाने 208 अन्न व्यावसायिकांना सुधारणा नोटीस देण्यात आल्या असून 31 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच 24 अन्न आस्थापनांमधून नमुने घेऊन 92 लाख 53 हजार 129 रूपये किंमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय 45 ठिकाणी धाड टाकून 1 कोटी 17 लाख 62 हजार 134 रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ग्राहकांनी तयार अन्नपदार्थ, विशेषतः मिठाई व इतर दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करावी. मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर खावून संपवावेत अथवा रेफ्रिजरेटरमध्ये योग्य तापमानास साठवावेत. अन्नपदार्थ विक्रेत्यांनी सर्व अन्नपदार्थ चांगल्या व आरोग्यदायी वातावरणामध्ये बनवावेत व विक्री करावी. तसेच शिळे अन्नपदार्थ विक्री केले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अन्न परवाना/नोंदणी घेतल्याशिवाय अन्नपदार्थांचा व्यवसाय करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

मंडळानी महाप्रसाद तयार करण्यासाठी केटरर नेमताना तो परवानाधारक/नोंदणीधारक असल्याची खात्री करूनच नेमावा. तसेच स्वच्छतेबाबतच्या नियमांचे पालन करून अन्न विषबाधेसारख्या अप्रिय घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन सर्व गणेश मंडळांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा