You are currently viewing जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा इंडिया सॅनिटेशन कॉनक्लेव्हमध्ये सहभाग

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा इंडिया सॅनिटेशन कॉनक्लेव्हमध्ये सहभाग

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा इंडिया सॅनिटेशन कॉनक्लेव्हमध्ये सहभाग

सिंधुदुर्ग

स्वच्छता व्यवस्थापनात केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यापेक्षा त्यांची प्रभावी अंमलबजावणी, शाश्वत देखभाल आणि त्यातून साध्य होणाऱ्या परिणामांचे प्रभावी मूल्यांकन हेच प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांची मर्यादित आर्थिक क्षमता, पर्यटनामुळे वाढणारी तरंगती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारे कचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे आव्हान लक्षात घेता, स्थानिक गरजांवर आधारित लवचिक व शाश्वत स्वच्छता व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

            नवी दिल्ली येथे झालेल्या १० व्या आयएससी-एफआयसीसीआय सॅनीटेशन अवॉर्ड्स सिरेमनी आणि इंडीया सॅनिटेशन कॉनक्लेव २०२६ मधील ‘अनलॉकिंग वॉश इंपॅक्ट थ्रू पार्टनरशिप्स’ या परिसंवादात त्या मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी सहभागी झाल्या होत्या.

            त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छता व्यवस्थापनातील आर्थिक अडचणी अधोरेखित करताना सांगितले की, ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक संस्थांवर सोपविण्यात आली असली, तरी ग्रामपंचायती आणि छोट्या नगरपालिकांची आर्थिक क्षमता अद्याप मर्यादित आहे. स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशनसारख्या योजनांत केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असला, तरी पायाभूत सुविधांची देखभाल व दुरुस्तीचा खर्च स्थानिक संस्थांसाठी आव्हानात्मक ठरतो. त्यामुळे स्थानिक गरजांनुसार स्वतंत्र व शाश्वत आर्थिक मॉडेल विकसित करण्याची आवश्यकता आहे.

            पर्यटनामुळे सिंधुदुर्गात स्थिर लोकसंख्येपेक्षा मोठी तरंगती लोकसंख्या निर्माण होत असल्याने कचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण येतो. या पार्श्वभूमीवर पारंपरिक घनकचऱ्यासोबतच प्लॅस्टिक व ई-कचऱ्याचे उगमस्थानी व्यवस्थापन, विस्तारित उत्पादक जबाबदारीची EPR काटेकोर अंमलबजावणी आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीवर भर देणे गरजेचे आहे. स्थानिक गरजांवर आधारित ‘Bottom-up’ दृष्टिकोन स्वीकारून स्टार्टअप्स, खासगी क्षेत्र व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून स्वच्छता व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था उभी करावी, तसेच अशा भागीदारीचा खर्च व परिणामकारकता तपासण्यासाठी प्रभाव मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे या क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयएससी येणाऱ्या कालावधीत काम करणार आहे.

            या परिसंवादाच्या पॅनेलमध्ये आयएससीच्या अध्यक्ष नैना लाल किडवाई, स्वच्छ भारत मिशनच्या संचालक सुरभी मलिक, भारत सरकारच्या पाणी आणि स्वच्छता मंत्रालयाच्या उपसचिव अँजल भाटी चौहान, जम्मू-काश्मीर शासनाचे विशेष सचिव नरिंदर खजुरिया, कोहलेर कंपनीच्या प्रादेशिक सोशल इम्पॅक्ट मैनेजर ऋषिका जयस्वाल, साहस झिरो वेस्टच्या सीइओ शोभा राघवन आणि एचएसबीसीचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट रोमित सेन यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सहभागी झाल्या. सूत्रसंचालन आयटीसी लिमिटेडचे कार्यकारी व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रमुख – सोशल इनव्हेस्टमेंट्स प्रभाकर लिंगारेड्डी यांनी केले. या वेळी वॉश क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांना सॅनीटेशन अवॉर्ड्स प्रदान करण्यात आले.

 

०००००

 

 

 

 

नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प करत अभियान यशस्वी करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ

 

        सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका)  : शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. तसेच पीक पाहणी आणि मतदार यादीतील दुरुस्ती या मोहिमांनाही नागरिकांनी पूर्वीप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद मिळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित शासकीय सेवा आणि योजनांची व्याप्ती वाढवून प्रशासकीय कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणणे, प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढणे आणि विविध दाखले थेट जनतेच्या दारात पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे विशेष ‘सेवा संकल्प अभियान’ १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले जात आहे.

            या शुभारंभ कार्यक्रमाला तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह कार्यालयातील प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविकात तहसीलदार सचिन पाटील यांनी कार्यालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. कुडाळ तहसील कार्यालयाने विहित मुदतीत तब्बल १३ हजार दाखल्यांचे यशस्वी वाटप केले असून, कोणताही वर्ग १ च्या जमिनीसाठी शासकीय नियमातील नवीन तरतुदी नुसार नजराना न घेता ३५ प्रकरणे तातडीने मार्गी लावली आहेत, असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या अभियान कालावधीतही जनतेला विहित वेळेत विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून देण्याचा ‘सेवा संकल्प’ प्रशासनाने केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

            कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उपस्थित पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे थेट वाटप करण्यात आले. कोणत्याही त्रासाविना आवश्यक दाखले तात्काळ हातात मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

सकस आहारातून ॲनिमियावर मात करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

महिला व बाल रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम संपन्न

        सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : पोषण आणि ॲनिमिया जनजागृती हा विषय मुली व महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा घर आणि कामाच्या व्यापात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा थेट परिणाम जन्माला येणाऱ्या अपत्यावरही होतो. त्यामुळे तरुणींनी जंक फूड टाळून सकस पोषणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. चांगल्या व योग्य पोषण आहारामुळे सर्व प्रकारचे आजार दूर ठेवता येतात; आपण सर्वांनी मिळून ‘ॲनिमिया मुक्त भारत’ हा संकल्प प्रत्यक्षात आणूया आणि सकस आहारातून ॲनिमियावर मात करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

            कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी महिला व तरुणींना योग्य पोषण आणि ॲनिमिया प्रतिबंधात्मक उपायांबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती दिली. शरीरातील रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी स्थानिक सकस अन्नपदार्थ, पालेभाज्या आणि फळांचे सेवन किती गरजेचे आहे, हे तज्ज्ञांनी पटवून दिले. विशेष म्हणजे, पोषण आहाराचे प्रत्यक्ष महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमात विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्सही उभारण्यात आले होते.

            या जनजागृती कार्यक्रमाला परिसरातील महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

            व्यासपीठावर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाळके, रुग्ण कल्याण समिती सदस्या रश्मी नाईक, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीतम जगताप यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग यांनी मानले.

 

०००००

Regards :

District Information Office,
Sindhudurg.
diosindhudurg@gmail.com
02362-228859

Pl follow us on : 

Twitter :  https://twitter.com/InfoSindhudurg

blog :  https://diosindhu.blogspot.com

Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100009944297016

प्रतिक्रिया व्यक्त करा