आयुर्वेदिक मेडिकल उद्योजक तथा कळसुलकर इंग्लिश स्कूलचे संचालक रवींद्र स्वार यांचे निधन
अपघातानंतर गोवा बांबुळी येथे उपचार; मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर निधन, सावंतवाडीत शोककळा
सावंतवाडी :
उभा बाजार येथील रहिवासी, आयुर्वेदिक मेडिकलचे उद्योजक तथा कळसुलकर इंग्लिश स्कूलचे संचालक रवींद्र वामन स्वार (वय ७६) यांचे मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहरासह स्वार, शिरसाट व मसुरकर कुटुंबीय तसेच मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कोलगाव येथे मोटारसायकलवरून सावंतवाडीतील आपल्या दुकानाकडे येत असताना त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आला. त्यामुळे झालेल्या अपघातात स्वार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.
उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना काही दिवसांनी सावंतवाडीतील घरी आणण्यात आले. मात्र, पुन्हा प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
रवींद्र स्वार यांच्या पश्चात मुलगा जयेश, मुली विशाखा व धनश्री असा परिवार आहे. त्यांचे मोठे बंधू दत्ताराम स्वार, मेहुणे नरेंद्र मसुरकर, बहीण अनघा मसुरकर, माया तसेच मसुरकर कुटुंबातील भाचे आणि अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
स्वार यांच्यावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
