You are currently viewing आला पहा भाद्रपद

आला पहा भाद्रपद

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आला पहा भाद्रपद*

 

 

सरी श्रावणी सरल्या ऊन सावल्यांचा खेळ

आला पहा भाद्रपद, घेऊन नवाशेचा मेळ,

पिके शेतात डोलती,त्यात भरलेला जोम

बळीराजाच्या डोळ्यात आता समाधानाचा मेळ..

 

पहाटे दवात भिजून, मृद्गंध दरवळे

पारिजातकाचा सडा, अंगणी गंधाची उधळण,

भाद्रपदाच्या येण्याने, मन मोदाने बहरते

सणांच्या मांदीयाळीने, घराला येते नवे वळण..

 

हरितालिका, गणपती, गौरींचे आगमन मोठे

लेकी-बाळी माहेरी येती अंगणी हास्याची लकेर,

मोदक, पुरण, आरास, उत्साहाला नसे तोटे

भाद्रपद म्हणजे नात्यांची घट्ट विणलेली तार..

 

पोळ्याच्या सणाला बैलाची पूजा होते

सखा बळीचा सजतो शेतकरी अभिमानी,

मान कष्टाला देणारा सण महाराष्ट्राचा जुना

बैलपोळा सांगतो आम्हाला, कृतज्ञतेची खरी गाणी..

 

पितरांच्या स्मरणाने होते पिठोरी अमावस्या

मातृदिन म्हणून माता मागे आयुष्याचीच आशा,

मुलाबाळांसाठी उपवास डोळ्यात वात्सल्य दाटते

भाद्रपद शिकवतो संस्कारांची खरी परिभाषा..

 

सरता पावसाळा, भरता शिवार, मन प्रसन्न होते

नदी-नाले तुडुंब भरले, धरती झाली हिरवी सारी,

भाद्रपद फक्त महिना नाही तो आहे सोनपरी

आनंद, भक्ती, कृतज्ञता, एकत्र नांदती घरोघरी..

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा