विटे (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने विटा नगरपरिषदेचे आरोग्य सभापती भालचंद्र भैय्या कांबळे यांच्या वतीने नगरपरिषद शाळा क्र. १९ मधील अंगणवाडी विद्यार्थ्यांना ‘डिजिटल पाटी’चे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी व्हावे, हा उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी आयईसी विभागाचे प्रमुख नितीन चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांसोबतच आधुनिक शैक्षणिक साधने देणे ही काळाची गरज आहे. डिजिटल पाटीच्या माध्यमातून मुलांना शिकताना आनंद मिळेल आणि त्यांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला चालना मिळेल. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी स्वच्छता, आरोग्य आणि पोषण याबाबतही जागरूक राहणे आवश्यक आहे. आज घेण्यात आलेली स्वच्छता शपथ ही केवळ कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी. नगरपरिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील,” असे त्यांनी नमूद केले.
आरोग्य सभापती भालचंद्र भैय्या कांबळे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल पाट्यांचे वाटप करताना लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला आणि कल्पकतेला नवी दिशा मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक उपक्रमात नेहमीच सक्रिय असलेल्या भालचंद्र कांबळे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने शाळा क्र 6 येथे व स्वातंत्र्य दिन निमित्त शाळा क्र 19 मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले आहे.
डिजिटल पाटी वाटप निमित्त शाळा क्र 19 मध्ये स्वच्छतेबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली. परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे आणि इतरांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
तसेच राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात साजरे करण्यात आले. बालकांच्या निरोगी वाढीसाठी संतुलित व पौष्टिक आहार, स्वच्छता आणि आरोग्य यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना व पालकांना समजावून सांगण्यात आले. लहान वयातच योग्य पोषणाच्या सवयी लागल्यास बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सोमनाथ गांगोडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अभि गायगवळे यांनी मानले. कार्यक्रमास विटा नगरपरिषदेच्या आयईसी विभागाचे प्रमुख नितीन चंदनशिवे, प्रमोद भोसले, सुरज मंडले, महेश झाडे, अभि गायगवळे, विजय चंदनशिवे, साक्षी जाधव, मुख्याध्यापक सोमनाथ गांगोडे यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
