माळगाव बागायतच्या अक्षय खोत यांचा राज्य चित्रपट पुरस्काराने गौरव
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार; बागायतच्या बंटी खोत आणि मिलिंद माळकर यांचेही मोलाचे योगदान
माळगाव बागायत :
माळगाव बागायत येथील आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले संगीतकार अक्षय खोत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘उत्कृष्ट संगीत’ या विभागातील पुरस्कार ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटासाठी अक्षय खोत यांना जाहीर झाला आहे.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाचे संगीत तसेच संपूर्ण पार्श्वसंगीत अक्षय खोत यांनी केले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या संपूर्ण पार्श्वसंगीताचे काम कोविडच्या काळात बागायत येथे राहूनच पूर्ण करण्यात आले. त्या काळात चित्रपटाची संपूर्ण प्रोडक्शन टीमदेखील बागायत येथे येऊन संगीत ऐकण्यासाठी आणि कामाची पाहणी करण्यासाठी येत असे. त्यामुळे या चित्रपटाच्या संगीतनिर्मितीच्या आठवणींमध्ये बागायतचेही एक खास स्थान निर्माण झाले आहे.
या संगीतप्रवासात बागायतचेच सुपुत्र बंटी खोत यांनी ढोलकी आणि पखवाज वादनाचे योगदान दिले, तर मिलिंद माळकर यांनी तबला वादनाची साथ दिली. स्थानिक मातीतल्या या कलाकारांनी दिलेले योगदान चित्रपटाच्या संगीताला अधिक समृद्ध करणारे ठरले. त्यामुळे अक्षय खोत यांच्या या राज्यस्तरीय यशात बागायतच्या या दोन्ही कलाकारांचाही मोलाचा वाटा असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
कोविडसारख्या कठीण परिस्थितीतही बागायतमध्ये राहून संगीतनिर्मितीचे हे काम पूर्ण झाले आणि आज त्याच संगीताला महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या राज्य चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, ही बाब माळगाव बागायतसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची ठरली आहे.
माळगाव बागायतसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपल्या कलेची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अक्षय खोत यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच बंटी खोत आणि मिलिंद माळकर यांच्या योगदानाचेही ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.
माळगावच्या मातीतून उमललेली ही संगीताची प्रतिभा आता महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. बागायतच्या कलाकारांनी दिलेली साथ आणि कोविडच्या काळात याच मातीतून साकारलेले संगीत आज राज्य पुरस्कारापर्यंत पोहोचले, ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
अक्षय खोत, बंटी खोत आणि मिलिंद माळकर या तिन्ही कलाकारांचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माळगाव बागायतसह संपूर्ण परिसरातून मनःपूर्वक अभिनंदन!
