You are currently viewing ओसरगावातील घंटागाडी दोन वर्षांपासून धूळखात; स्वच्छ भारत अभियानाला हरताळ!

ओसरगावातील घंटागाडी दोन वर्षांपासून धूळखात; स्वच्छ भारत अभियानाला हरताळ!

ओसरगावातील घंटागाडी दोन वर्षांपासून धूळखात; स्वच्छ भारत अभियानाला हरताळ!

दीड लाखांची घंटागाडी भंगारात जाण्याची वेळ; ग्रामस्थांचा संताप, जबाबदारांवर कारवाईची मागणी

ओसरगाव :

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ओसरगाव ग्रामपंचायतीला दिलेली घंटागाडी गेल्या तब्बल दोन वर्षांपासून वापराविना पडून असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नियमित वापराअभावी या घंटागाडीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सध्या ही गाडी भंगारात दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अंदाजे एक ते दीड लाख रुपये किमतीची ही घंटागाडी गावातील कचरा संकलनासाठी देण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ती गावात फिरताना दिसत नसल्याने ‘गावातील कचरा संकलनासाठी दिलेली घंटागाडीच वापरात नसेल तर ती काय कामाची?’ असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ओसरगावमधून जाणाऱ्या महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला दिसून येतो. संपूर्ण गावात घंटागाडी फिरविणे शक्य नसले तरी किमान महामार्गालगत तरी नियमितपणे घंटागाडी फिरवून कचरा संकलित केला असता, तर स्वच्छतेच्या दृष्टीने त्याचा काही प्रमाणात उपयोग झाला असता. मात्र, याकडेही संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
‘गावात राहिल्याशिवाय समस्या समजणार नाहीत’
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शासनाकडून गावांच्या स्वच्छतेसाठी निधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना, प्रत्यक्षात त्यांचा वापर होत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘गावात राहिल्याशिवाय गावाच्या समस्या समजणार नाहीत,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या गंभीर प्रकाराची जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर तसेच कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
घंटागाडी पुन्हा वापरात न आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
गावाच्या स्वच्छतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली घंटागाडी दोन वर्षे वापराविना पडून राहणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ‘उघडा डोळे, बघा नीट’ असे म्हणत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे. आठवड्यातून दोन-चार दिवस तरी ही गाडी गावात फिरताना दिसली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत, लवकरात लवकर घंटागाडी प्रत्यक्ष वापरात आणली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
‘फक्त चिंतामणी नको, गावाच्या स्वच्छतेचीही चिंता करा,’ अशा शब्दांत ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा