*जागेची तत्काळ स्थळपाहणी व मोजणी पूर्ण करण्याचे निर्देश*
सिंधुदुर्ग :
हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकासाठी जागेची स्थळपाहणी करून मोजणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. ग्रामस्थांशी विचारविनिमय करून सुचवलेल्या पर्यायी जागांची पाहणी करावी व त्यांपैकी एक जागा अंतिम करावी. तसेच जागेची मोजणी आणि तज्ज्ञांची नेमणूक यांसारख्या प्रक्रिया वेगाने पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, बांधकाम व वित्त सभापती संतोष साटविलकर, काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राममोहन पाठक, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कार्यकारी अभियंता डी. बी. बागुल, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, नगररचना विभागाचे सहायक संचालक रवींद्र बनसोड आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
पादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांचे स्मारक मालवण तालुक्यातील मौजे पराड या त्यांच्या वडिलांच्या मूळ गावी उभारण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव असून, या स्मारकास शासनाने यापूर्वीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. स्मारकासाठी जागा निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी योग्य जागेची निवड करून पुढील कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश दिले होते.
बाबुराव विष्णू पराडकर यांचे वडील काशी येथे स्थायिक झाले होते. बाबुरावांचा जन्म काशीत झाला असला तरी मराठी मुळांशी जोडलेल्या या सुपुत्राने हिंदी पत्रकारितेत अद्वितीय आणि अमूल्य योगदान दिले. त्यांनी हिंदी पत्रकारितेत ३०० हून अधिक नवीन पारिभाषिक शब्द रूढ केले, अशी माहिती काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राममोहन पाठक यांनी यावेळी दिली.
