स्वरोपासना वार्षिक उत्सवामध्ये ‘कागदाची होडी’ बालगीताचे लोकार्पण
पिंपरी
वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच गीत फुलोरा काव्य गायनाच्या कार्यक्रमाच्या २२ व्या वर्षानिमित्त एल्प्रो सभागृह, चिंचवड येथे रविवार, दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित वार्षिक उत्सवामध्ये स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी यांच्या ‘कागदाची होडी’ या बालगीताचे लोकार्पण बालभारती कलाशिक्षण विभाग प्रमुख डॉ. अजयकुमार लोळगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पं. बाळासाहेब सूर्यवंशी, सचिव पं. सुधाकर चव्हाण, पदाधिकारी क्षमा गोडसे, संध्या केळकर, सुरभी ब्युटी अकॅडमीच्या संचालिका श्रुती मनवेलीकर तसेच स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी आणि अथर्व कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी – पालक वृंदांची उपस्थिती होती.
‘दिली बाबांनी मला
कागदाची होडी
चाले डौलाने कशी
पाण्यातली मासोळी’
हे गीत गीत फुलोरा (geetfulora) या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असून ‘गीत फुलोरा’ हा उत्तम कवितांचा तसेच बालभारतीतील कवितांच्या गायनाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या २२ व्या वर्षानिमित्त सदरील गीताचे लोकार्पण करण्यात येत असून हे गीत अथर्व कुलकर्णी आणि भाग्यदा कुलकर्णी यांनी गायलेले आहे; तर अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केले आहे.
मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा आपल्या बालपणातील पावसाळा आणि त्यामध्ये कागदाच्या होड्या सोडण्याची गंमत या गीतातून अभयार्पिता यांनी या गीतातून सुंदर रीतीने मांडली आहे, त्यामुळे सर्व रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा,
असे आवाहन मान्यवरांनी याप्रसंगी आपल्या मनोगतातून केले. वार्षिक उत्सवात
स्वरोपासनाच्या शंभर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये राग गायनासह विविध गीतांच्या माध्यमातून सलग दहा तासांचे संगीतमय सादरीकरण केले. ‘जय जगदीश हरे’ तसेच सरस्वती स्तवन गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध रागदारी आणि शेवटी विविध गीतांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी संयोजित केलेला होता. निवेदनापासून ते वेशभूषेपर्यंत सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली. संचालिका अर्पिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले. औपचारिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले; तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी पार पाडले. गीताच्या लोकार्पण प्रसंगी डॉ. अजयकुमार लोळगे यांनी, ‘कागदाची होडी हे गीत प्रत्येकाच्या बालपणातला उजाळा देणारे असून लहान होऊन जगता आले पाहिजे’ असे विचार व्यक्त केले. सुमारे बावीस वर्षापासून कवितेवर कार्यक्रम करणारे हे जोडपे खूप भावले अशा भावना व्यक्त केल्या; तसेच यापुढेही बालभारती गीत फुलोरा उपक्रमाची नक्कीच दखल घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली. पं. बालासाहेब सूर्यवंशी यांनी, ‘स्वरोपासना आणि गीत फुलोरा म्हणजे ‘संगीतमय संस्कार केंद्र’ असे गौरवोद्गार काढले.
पं. सुधाकर चव्हाण यांनी शंभर विद्यार्थ्यांनी सूरतालात गायल्याबद्दल कौतुक करून रियाजाचे महत्त्व सांगितले.
संध्या केळकर यांनी बालपणीच्या कवितांच्या भाव विश्वात नेणारी कविता असे मत व्यक्त केले. क्षमा गोडसे यांनी चिमुकल्या मुलांच्या ओठांवर येणारी गाणी, कविता, सरगम ऐकून आनंद व्यक्त केला. श्रुती मनवेलीकर यांनी अथर्वच्या राग गायनाचे तसेच गीत गायनाचे कौतुक करून स्वरोपासना नवीन पिढीसाठी किती आवश्यक आहे याचे महत्त्व सांगितले. वय वर्ष साडेतीन पासूनच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. राग भूप, भीमपलास, बागेश्री, काफी, देस, दुर्गा, खमाज यांसह मालकंस, तिलंग रागांचे सादरीकरण करण्यात आले. तबला, हार्मोनियम कीबोर्ड, गिटार वादनासह विद्यार्थ्यांनी सुंदर प्रस्तुती केली. अथर्व कुलकर्णी यांनी राग मधुवंती बडा ख्याल आणि आवडे पंढरी हे भक्तिगीत सादर केले. अभय कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी, सूर्याक्ष शर्मा, विकास शिंदे यांनी हार्मोनियम, तबलासंगत आणि गायनसाथ केली. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८३०१
७४९८१८९६८२
