वेंगुर्ले नगर वाचनालयाचे आदर्श शिक्षक, शिक्षिका व शाळा पुरस्कार जाहीर
डॉ. श्रीराम दिक्षित, वैभवी रायशिरोडकर यांची निवड; नारायण विद्यामंदिर आसोलीला आदर्श शाळेचा मान
वेंगुर्ले
नगर वाचनालय, वेंगुर्ले या संस्थेतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या मानाच्या आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षिका आणि आदर्श शाळा पुरस्कारांची यंदाची निवड जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी माध्यमिक विभागातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिरोडा येथील अ. वि. बावडेकर विद्यालयाचे डॉ. श्रीराम दिक्षित यांची निवड करण्यात आली आहे.
आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी आसोली शाळा क्रमांक १च्या शिक्षिका वैभवी रायशिरोडकर यांची निवड झाली आहे. तसेच आदर्श शाळा पुरस्काराचा मान ‘श्री नारायण विद्यामंदिर, आसोली नं. १’ या प्राथमिक शाळेला मिळाला आहे.
या पुरस्कारांचे वितरण २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षिकांसह शाळेच्या योगदानाचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास परिसरातील शिक्षणप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर आणि कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
