प्रकाश राऊळ, मेघना राऊळ यांच्या प्रदीर्घ शिक्षणसेवेचा शिक्षक दिनी गौरव
३५ व ३८ वर्षांच्या ज्ञानदानासह सामाजिक कार्याची लायन्स क्लबकडून दखल
सावंतवाडी :
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणारे लायन प्रकाश राऊळ आणि मेघना प्रकाश राऊळ यांचा लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी आणि रॉयल लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला.
लायन प्रकाश राऊळ गेल्या ३५ वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सध्या ते सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव तसेच लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाची दखल घेत दोन्ही लायन्स क्लबच्या वतीने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
मेघना प्रकाश राऊळ यांनी गेल्या ३८ वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे. सध्या त्या समता मंडळ, सावंतवाडीच्या सचिव असून लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला सलाम करत शिक्षक दिनानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
५ सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो, या भावनेतून प्रकाश राऊळ व मेघना राऊळ यांचा करण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करणारा ठरला.
यावेळी लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष लायन सुनील दळवी, पदाधिकारी एमजेएफ लायन अभिजीत पणदुरकर, सावंतवाडी रॉयल लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन सुधीर आडीवरेकर, तसेच लायन अमित गवंढळकर, लायन गणेश बोर्डेकर, लायन गजानन नाईक यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.
