आटपाडी / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
आटपाडी बाजार समितीत नुकत्याच झालेल्या लिलावात डाळींबाला चांगला दर मिळाला. डाळिंबाला यंदाच्या हंगामातील सर्वोच्च २५१ रूपये प्रतिकिलो दर मिळाला. बाजारात श्रावण व गणपती उत्सवाच्या तोंडावर डाळिंबाचे दरही तेजीत असल्याचे बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी सांगितले. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंबाच्या बाजारभावात सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे. हरीओम फ्रुट मार्केटिंग दुकानात निजार शेख यांनी लावलेल्या डाळिंबाला प्रतिकिलो २५१ रूपयांचा दर मिळाला. यंदाच्या हंगामातील हा सवोच्च दर आहे.
सध्या मृग बहार समाप्तीकडे असून आवकही कमी झाली आहे. श्रावण व गणपती उत्सव यामुळे डाळिंबाला मागणी असून मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर चांगले मिळत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. राज्याच्या विविध भागात डाळिंबाचे उत्पादन घेणारे शेतकरी या आटपाडी बाजार समितीत डाळिंब विक्रीस आणतात. डाळिंबाच्या बाजारभावातील प्रत्येक चढ-उताराचा थेट परिणाम हजारो उत्पादक शेतकर्यांवर होतो. उपलब्ध बाजारभावाच्या नोंदीनुसार २६ ऑगस्टला आटपाडी बाजारात भगवा डाळिंबाची ३१२७ क्विंटल आवक झाली होती. त्यावेळी किमान दर १० रुपये किलो, कमाल दर १११ रुपये किलो, तर सरासरी दर ६० रुपये किलो होता.
२८ ऑगस्टला २४२० क्विंटल आवक झाली आणि कमाल दर १२५ रुपये किलो, तर सरासरी दर ६० रुपये किलो नोंदवला गेला. ३० ऑगस्टला कमाल दर १३० रुपये किलो आणि सरासरी दर ७० रुपये किलो राहिला. तर आजच्या सौद्यामध्ये किमान दर ६० तर कमाल दर २५१ रूपये मिळाला. दरम्यान, बाजारातील दर्जेदार मालाला वाढती मागणी मिळत असल्याने चांगल्या प्रतवारीच्या डाळिंबाला अधिक भाव मिळत आहे. बाजार समितीने शेतकर्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पारदर्शी सौदे होत असल्याने शेतकरी आटपाडी बाजार समितीत विक्रीसाठी डाळिंब आणत असल्याचे सभापती संतोष पुजारी यांनी सांगितले.
