ज्ञानदा लिंगायतची नवोदय विद्यालयासाठी निवड; मांगवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा
मांगवली :
वैभववाडी तालुक्यातील विद्या मंदिर मांगवली नं. १ या शाळेतील कु. ज्ञानदा प्रदीप लिंगायत हिची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मांगवली परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ज्ञानदाने आपल्या मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल नांदुरकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकवृंदाने घेतलेली मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे ज्ञानदाला नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत यश मिळविता आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविणे ही अत्यंत अभिमानास्पद कामगिरी मानली जाते. ज्ञानदाच्या या यशामुळे विद्या मंदिर मांगवली नं. १ या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ज्ञानदाच्या यशाबद्दल तिचे पालक, मुख्याध्यापक राहुल नांदुरकर सर, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन तसेच मांगवली ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. महेश संसारे, माजी सरपंच तथा शिक्षणतज्ज्ञ सदस्य, मांगवली आणि सौ. सुवर्णा महेश संसारे, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य, पंचायत समिती वैभववाडी यांनी ज्ञानदाचे हार्दिक अभिनंदन केले. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, “ज्ञानदाचे हे यश तिच्या मेहनतीची आणि जिद्दीची पावती असून, भविष्यात तिने मोठी भरारी घ्यावी,” अशी सदिच्छा व्यक्त केली.
ज्ञानदाच्या यशामुळे मांगवली गावासह संपूर्ण वैभववाडी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
