You are currently viewing पहिला पाऊस– पहिलं प्रेम

पहिला पाऊस– पहिलं प्रेम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*पहिला पाऊस– पहिलं प्रेम* 

 

माझं पहिलं प्रेम पावसावर आहे. त्यातल्या त्यात पहिल्या पावसावर आहे…. पहिला पाऊस आला की लहानपणीचे मित्र मैत्रिणी ब-याच दिवसांनी भेटल्यावर जो आनंद होतो ना अगदी तसाचं आनंद मला पहिला पाऊस आल्यावर वाटतो…

पहिल्या प्रेमातला ओलावा आणि पहिल्यावहिल्या पावसातलं भिजणं ह्यांमधला आनंद हे जो पावसावर प्रेम करतो ना त्यालाच हे कळतं.. पण त्यासाठी मात्रं पावसावर मनापासून प्रेम करायला हवे…

पहिल्या पावसाच्या वेळी आभाळ भरून येतं जणू काही आभाळाच्या निळ्या गाभा-यात सावळं रूप साकार उभं राहतं त्यात पांढरे शुभ्र पक्षी ओळीनं घरी परतताना तुळशीच्या माळेसारखे जणू त्या सावळ्या रूपाच्या गळ्यात रुळल्यासारखे वाटतात तर खाली झाडे आपल्या फांद्यांचे हात वर करून त्यांचे जणू काही स्वागत करून ओळीनं पावसाच्या वारीत सामील झाल्यासारखे वाटतात…मग वा-याच्या जोरदार तालांवर सळसळणारी झाडांची पाने जणू काही मृदंग-टाळ वाजवतायेत असा भास मला होतो. त्यात पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा वास जणू काही अबीर बुक्क्यासारखा मनात दरवळतो… दरवळत राहतो.. त्यामुळे आषाढात जेव्हा एकादशी येते तेव्हा आभाळात ढगांची दाटी आणि विजेची पताका पाहून प्रत्यक्ष सावळं रूपच माझ्या भेटीला आले आहे की काय असा जणू काही साक्षात्कार होतो… इतकचं नाही तर पहिल्याच पावसानं मातीही सुखावून जाते आणि तृप्त होते. याच पहिल्या पावसात मातीचीही कूस भरून जाते आणि मातीतील लक्ष लक्ष बिजे मनात म्हणतात आम्ही झालो गर्भवासी.. असा आगळाचं एक आध्यात्माचा अनुभव निदान मला तरी पहिल्या पावसात येतो आणि

भिजताना मोक्षप्राप्तीचा आनंदही होतो…

पहिला पाऊस पडून गेल्यावर वातावरणच बदलून जाते. वा-यात गारवा येतो.. माती सुखावलेली असते. त्यात वळीव आपला लहरीपणा करीत मजा करून गेलेला असतो. मग येणा-या मृगाचा पाऊस अगदी मस्त होऊन व धुंद होऊन जेव्हा बरसतो ना तेव्हा मात्रं खरी पावसाला सुरुवात होते. त्यात मृगाचं पाणी सगळीकडे सारखंच पडतं आणि मनसोक्त बरसतं…अगदी मनात भिनेपर्यंत.. मृगाचं वळीवाच्या पावसासारखं नसतं वळीव मात्रं कधी येतो आणि कधी जातो हे कळतचं नाही…बरं त्याच्या मनात सापत्न भाव.. या बांधावर पडतो तर त्या बांधावर पडत नाही… कधी कधी तर शेजा-याच्या वावरात पडतो पण आपल्या शेतावर रुसतो. या गावावर मर्जी करतो तर त्या गावावर नाराजी करतो.. आमच्या गावावरून गेला पण पडला नाही अशी ओरड वळवाच्या पावसाबाबत सा-यांचीच असते…थोडक्यात काय तर वळवाचा पाऊस पाहुण्यासारखा येत असला तरी तो परका वाटतो…

पाहुण्यासारखाच दारातून उभ्या-उभ्या येतो आणि भेटून जातो म्हणजे तो इतका घाईत असतो की जणू काही त्याला कुठेतरी अपॉईन्टमेंट असते. त्याची कुणीतरी वाट बघत असते पण अशा घाईतही जरा चहा तरी घेऊन जा असा आग्रह केला तर आता नको म्हणून पाहुण्यासारखाच तरातरा चालत चालत तो कधी जातो हे कळतचं नाही…तसं मृगाच्या पावसाचं नाही.. तो मनमोकळा असतो आणि मनसोक्त पडतो.. कसलाच पंक्तीप्रपंच नाही.. त्यात उदार मनानं तो ज्या मस्तीत आणि धुंदीत येतो ना त्यामुळे मला त्याला आपल्याच बेंबीतील कस्तुरीनं धुंद झालेल्या कस्तुरी-मृगाची उपमा दिल्याशिवाय राहवत नाही. पण मनात आलं तर अगदी कोरडा जाईल. घुम्या बैलासारखा कुणाकडेच बघणार ही नाही… तो तसाच जाऊ नये म्हणून तर मृगासाठी माती तळमळत असते.. व मृगाच्या थंडगार शिडकाव्यात ती जन्माची तृप्त ही होते. मग मृगही कुणालाच अतृप्त ठेवत नाही…

पहिल्या पावसाच्या स्पर्शात ती एवढी हरकून जाते की तिच्या सा-या वेदनाच थांबतात म्हणूनच मला पहिल्या पावसाची अपूर्वाई वाटते…

पहिला पाऊस जसा मला आवडतो तसाच तो जर गावाकडचा असेल तर जास्तच आवडतो… गावात जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा गुरं-वासरं उधळत घरच्या ओढीनं येतात तर गोठयात बांधलेली वासरं पहिल्या पावसात अशी हंबरतात की त्यांना वाटतं आता सा-या माळरानावर शेपटी वर करीत हुंदडावं आणि खूप खूप भिजावं… माळरानावर पहिला पाऊस आला की गुरं-वासरांची जी तारांबळ उडते ना ती बघण्यासारखी असते. गुराखी पोत्याची वा घोंगडीची खोळ करून गावरान छत्रीचा वापर करतात. पण जेव्हा पहिल्या पावसात भिजलेली गुरं-वासरं एखाद्या झाडाखाली जमतात तेव्हा झाडालाही आपले सगेसोयरे घरी जमलेत असं वाटतं… असा आगळा-वेगळा अनुभव गावाच्या माळरानावरच मिळतो तोही पहिल्या पावसात…!! पहिला पाऊस माळरानावर पडताच दोन दिवसात माळरान पोपटी शाल पांघरतो. डोंगरावर पहिला पाऊस हिरवी चादर घालतो.. तर कौलारू घरांची कौलारू छपरे स्वच्छ मुद्रेने आणि समाधानाने हसत असतात…

पहिल्या पावसात भिजण्याची काय गंमत असते नाही…! त्यात जोडीला जर कोण असेल तर दुधात साखर.. (नाही नाही पावसात साखर..!)

हीच तर खरी जादू आहे पहिल्या पावसाची..

रागावलेल्या प्रियकराची वाट बघावी तशी मी पहिल्या पावसाची वाट बघते.

पहिलं प्रेम, पहिली कविता,पहिलं मूल किंवा पहिला वाढदिवस असे अनेक यात जे जे पहिलेपणाची जी अपूर्वाई आहे ती काही औरच असते. आपण रोजच नळाच्या पाण्यानं आंघोळ करतो पण पहिल्या पावसानं घातलेल्या स्नानाची सर त्याच्याशिवाय कुणालाच नाही म्हणून पहिल्या पावसात जो भिजत नाही त्याला म्हणावे ? नंतरच्या पावसात मग काही लोक भिजण्यासाठी पावसाळी सहली काढतात.. पण पहिल्या पावसात भिजायची मजा काही औरच…!!

म्हणूनच पहिल्या पावसाचं कौतुक..!

पहिल्या पावसाने सचैल स्नान केल्यासारखा शुचिर्भूत होणारा देवळाच्या पारावरला सोन्याचा पिंपळ चैतन्याने भिजून जातो व देवळाच्या सोनेरी कळसावर पहिल्या पावसाचा अभिषेक होताना पाहून मन कसे प्रसन्न होते आणि मी पहिल्या पावसावर अधिकच प्रेम करू लागते.!

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा