You are currently viewing आठवणीतला तो जुनाच पाऊस

आठवणीतला तो जुनाच पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*–आठवणीतला तो जुनाच पाऊस–*

 

पाऊस आणि आठवणींचं किती जवळचं समीकरण आहे नाही…!

दरवर्षी पाऊस नव्याने पडतो.. आणि दरवेळेला तो आपल्याला नव्याने भूतकाळात घेऊन जातो… कधी लहापणाचा पाऊस आठवतो तर मित्र- मैत्रीणीं सोबतचा दंगामस्ती करणारा पाऊस , पावसात खेळलेले क्षण, आईचा पावसात भिजू नको ? म्हणून खाल्लेला ओरडा वा मार असो पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडलेल्या आठवणी असो तर कधी शाळेत जाताना गणवेश दप्तर भिजत, मध्ये खड्यांत साचलेल्या पाण्यात थुईथुई नाचत मस्ती करत गेलेला पाऊस आठवतो. कधी कॉलेज मधला पाऊस.. मज्जा करणारा एक आगळा वेगळा पाऊस कॉलेजमध्येच अडकलेलो असताना मित्र मैत्रिणीसोबत कॅन्टीन मध्ये वडापाव ,भजी,चहाचा आस्वाद घेत घालवलेला वेळ आठवतो तर कधी प्रेमात पडल्यावर प्रियकरासोबत चिंब चिंब भिजलेले क्षण.. नकळत झालेले स्पर्श आठवून मनात गुदगुल्या होतात. अंग मोहरून जाते. एकमेकांसोबत भिजलेला तो पहिला पाऊस आठवतो त्यासोबतच्या आठवणी आठवतात.

पावसाच्या आठवणींना कुठे बंधन असतं म्हणा….

पावसाच्या आठवणींची ही शृंखला वाढतचं जाते…

जशी कातरवेळ आठवणींना घेऊन येते अन् भावनिक बनवते तसाच हा पाऊसही मला भावनिक करून जातो जुन्या आठवणींना उजाळा देतो. रोमँटिक बनवतो प्रेमात पाडतो तर कधी आयुष्य जगायलाही शिकवतो. तर कधी कधी आयुष्यभराचा धडाही शिकवून जातो तर कधी स्वतःला सावरायला शिकवतो.

प्रत्येकाला पाऊस हा हवा हवासा वाटतो. पावसाची दर वर्षी आतुरतेने वाट ही पाहतेच आणि खरं सांगायचं तर ग्रीष्मातल्या कडक उष्णतेला  शमवून आपल्याला गारवा देण्याची ताकद फक्त त्या पावसातच आहे बरं म्हणूनच तो जुना वाटणारा पाऊस नव्याने बरसला की पाऊस मनाला एक आत्मीय समाधान देतो आनंद देतो. आठवणींच्या हिंदोळ्यावर प्रेमाचे आपुलकीचे प्रतिबिंब उमटवून जातो.

आणि कधी असलीच पावसाला दुःखाची लकेर तरी तो अडचणीत आयुष्य जगायला शिकवतो.

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी — ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा