*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिवार*
माझ्या भावाच्या शेतात
पाणी वाहे झुळूझुळू
ढवळ्या पवळ्याची जोडी
घुंगराची खुळु खुळु **
गार गार पाटामंदी
खळं खळं पाण्यासंग
माती तुडवते माय
गाई जनीचा अभंग **
खुरपे हातात घेवुन
माय निंदण्यास जाई
पाणी पाटाचं वाहतं
वावरात बारे देई **
बारा बिग्याची जमीन
कष्ट करी भाऊराया
आई बापाची त्यावरी
लई मोठी छत्र छाया **
मोट हाकी भाऊराया
पाणी वाहते पाटाचं
कष्ट करीतो मोलाचं
मोल मिळतं लाखाचं **
*श्रीम. शीला पाटील. चांदवड.*
