*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी पंकज प्रदीप अंबिके लिखित अप्रतिम कथा*
*शेजार – नात्यांच्या पलीकडचे नाते*
ही गोष्ट आहे साधारण १९९८ ते २००२ या काळातील…
त्या वेळी आम्ही वालचंदनगरमध्ये राहत होतो. आमच्या घराच्या शेजारील घरात बाहेरून दोन-तीन तरुण राहायला आले. ते कुठले आहेत, काय काम करतात, याची आम्हाला सुरुवातीला फारशी माहिती नव्हती. एवढंच समजलं होतं की ते बिहारचे आहेत.
त्या काळात आम्ही लहान होतो. बिहारबद्दल आमच्या मनात फार काही चांगल्या कल्पना नव्हत्या. आजूबाजूला ऐकलेल्या गोष्टी, लोकांच्या बोलण्यातून तयार झालेली मतं आणि हिंदी चित्रपटांमध्ये बिहारचं दाखवलं जाणारं गुंडगिरीचं चित्र—यामुळे मनात एक वेगळीच भीती होती.
म्हणून शेजारच्या घरात नवीन तरुण राहायला आले म्हटल्यावर आम्ही त्यांच्याकडे थोडं कुतूहलाने आणि थोडं संशयानेच पाहत होतो.
पण माणूस ओळखायला त्याचा प्रदेश नाही, तर त्याचा स्वभाव पाहावा लागतो, हे आम्हाला पुढे त्यांच्यामुळेच कळणार होतं.
काही दिवस गेले…
हळूहळू त्या तरुणांशी आमची ओळख वाढू लागली. चाळीतली मुलं संध्याकाळी क्रिकेट खेळायला जमायची आणि हे तरुणही आमच्यात मिसळून जायचे. कुणी मोठं-लहान असं न मानता ते सगळ्यांशी आपुलकीने बोलायचे.
त्यांच्यातला एक तरुण होते —विकास.
विकास कॅनरा बँकेत नोकरीला होते. त्यांचा भाऊ बँकेच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. दिवसभर नोकरी आणि अभ्यास करूनही संध्याकाळ झाली की हे सगळे आमच्यात येऊन क्रिकेट खेळायचे.
क्रिकेट सुरू झालं की चाळीचं वातावरणच बदलून जायचं. कधी कुणाच्या घराच्या अंगणात, तर कधी रस्त्यावरच आमचे सामने रंगायचे. खेळताना कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षा सगळ्यांनी एकत्र खेळण्याचा आनंद मोठा होता. आणि मग एक दिवस अशीच क्रिकेटची चर्चा सुरू झाली—
भारत-पाकिस्तानचा सामना!
त्या सामन्याचं वातावरण काही वेगळंच होतं. त्यावेळी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं. टीव्हीसमोर बसून सामना पाहणं म्हणजे घरात सण असल्यासारखं वातावरण.
विकास तर प्रचंड टेन्शनमध्ये होते.
ते सतत टीव्हीकडे पाहत होते. भारताची विकेट पडली की त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसायची आणि भारताने चौकार मारला की ते आनंदाने उभा राहाय चे.
एकदा तर आमच्या घरीच सामना पाहताना त्यांना इतकं टेन्शन आलं की त्यांच्या अंगाला अक्षरशः घाम फुटला.
हे पाहून आमचे बाबा थोडे घाबरले. बाबांनी काळजीने विचार ले,
“अरे विकास, काय झाले? एवढा घाम का येतोय? तुला चक्कर-बिक्कर तर येणार नाही ना?” विकास मात्र टीव्हीकडे पाहत म्हणा ले,
“काका, भारत जिंकला पाहिजे! आज पाकिस्तानला हरवलंच पाहिजे!” बाबा त्याच्याकडे पाहून हसले.
त्या क्षणी बिहारचा तरुण, महाराष्ट्रातलं आमचं छोटंसं घर आणि भारत-पाकिस्तानचा सामना—या सगळ्यांच्या पलीकडे एक वेगळंच नातं तयार झालं होते ,सामना शेवटच्या टप्प्यात आला. प्रत्येक धाव महत्त्वाची वाटत होती.
घरात शांतता होती. कुणीही टीव्हीपासून नजर हटवत नव्हते.
आणि शेवटी… भारत जिंकला! क्षणात घरात जल्लोष झाला.
विकासच्या ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. काही वेळापूर्वी घामाने चिंताग्रस्त झालेले तोच विकास आता एखाद्या लहान मुलासारखा आनंद व्यक्त करत होते.
त्या दिवशी आम्हाला एक गोष्ट समजली—
माणसाला बिहार, महाराष्ट्र, उत्तर, दक्षिण अशा नावांनी ओळखण्यापेक्षा त्याच्या मनाने ओळखायला हवं. ज्यांच्याबद्दल आम्ही लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमुळे मनात भीती निर्माण झाली होती. तेच लोक पुढे आमच्या आयुष्याचा एक सुंदर भाग बनणार होते.
तो फक्त शेजार नव्हता…
ते हळूहळू नात्यांच्या पलीकडे जाणारं नातं बनत होते, पण त्या वेळी आम्हाला कुठे माहीत होतं… की पुढची काही वर्षं या शेजारच्या नात्याला अशा काही आठवणी देणार होत्या, ज्या आजही मनात ताज्या आहेत.
ही फक्त शेजाऱ्यांची गोष्ट नव्हती… ही होती माणुसकीने जोडलेल्या दोन वेगळ्या जगांची गोष्ट, आणि त्या नात्याची खरी सुरुवात अजून बाकी होती…
शेजार – नात्यांच्या पलीकडचे नाते
काळ पुढे सरकत होता…
विकास आणि त्यांच्या भावासोबतची आमची ओळख आता फक्त शेजाऱ्यांपुरती राहिली नव्हती. रोजच्या भेटीगाठी, क्रिकेटचे सामने, गप्पा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणं यामुळे आमच्यात एक वेगळाच आपलेपणा निर्माण झाला होता.
आणि मग एक-दोन वर्षांनी विकास ह्यांचं लग्न झाले, त्यांची पत्नी, आमची भाभी, बिहारमधून वालचंदनगरमध्ये आल्या होत्या , त्यांच्यासाठीही सगळंच नवीन होते —नवीन जागा, नवीन परिसर, नवीन माणसं आणि नवीन वातावरण, पण नवीनपणाची ती भावना फार काळ
टिकली नाही. कारण आमच्या आईशी त्यांचा परिचय हळूहळू वाढत गेला. सुरुवातीला साध्या गप्पा, घरातील कामांच्या चर्चा, अधूनमधून एकमेकींच्या घरी जाणे. आणि नकळत त्या नात्याला आपुलकीची किनार मिळत गेली. खरं तर तो काळ आमच्या दोन्ही कुटुंबांसाठी
एका नवीन नात्याची सुरुवात होती. रक्ताचं नातं नव्हते, गावाचं नातं नव्हते, जात-भाषेचं नातं नव्हते… पण तरीही मनं जवळ येत होती. आणि मग त्यांच्या घरात आलं एक छोटंसं बाळ— उज्ज्वल.
उज्ज्वल साधारण दोन वर्षांचा होता. त्यावेळी मी दहावीत होतो. आमच्या घरातही बऱ्याच वर्षांनी एखादे लहान बाळ खेळायला आलं होते. त्यामुळे उज्ज्वल फक्त शेजारच्या घरात ले बाळ राहिलं नव्हते; तो आमच्या घरा चाच एक छोटासा सदस्य झाल्यासारखा वाटू लागला होता .तो खूप लाडीक होता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—खूप हसरा!
उज्ज्वल आमच्या घरी आला की घरा चे वातावरणच बदलून जायचे. त्याचे ते निरागस हस णे, छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होणे आणि सगळ्यांच्या मागे फिरणे आम्हाला खूप आवडायचे, आमची आई तर त्याला खूप लाड करायची, प्रज्योतही उज्ज्वलला खेळवण्यात रमून जायचा.
“उज्ज्वल, इकडे ये…”
असं म्हणत त्याला जवळ बोलवायचे आणि तो मात्र आपल्या छोट्या छोट्या पावलांनी अंगणात दुडुदुडू पळत यायचा. कधी तो पडायचा, कधी उठायचा, पुन्हा धावायचा…
त्याला पकडण्यासाठी आम्ही त्याच्या मागे धावायचो आणि तो आमच्यापासून पळत सुटायचा. त्या छोट्याशा अंगणात त्याच्या पावलांचा आवाज अजूनही जणू कानात ऐकू येतो. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किती मोठी जागा घेऊन गेली आहे,
हे त्या व्यक्तीपासून दूर गेल्यावर कळतं, उज्ज्वलच्या बाबतीतही तसंच काहीसं होते.
आज इतकी वर्षं झाली…
पण आमच्या अंगणात दुडुदुडू धावणारा तो छोटासा उज्ज्वल, त्याचं निरागस हसू आणि त्याला खेळवताना आमच्या आईच्या चेहऱ्यावर येणारा आनंद ह्या सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
तेव्हा आम्हाला कुठे माहीत होते की शेजारच्या घरातून आलेली ही माणसं पुढे आमच्या आयुष्याच्या आठवणींचा एवढा मोठा भाग बनतील? काही नाती रक्ताने जोडली जातात…
काही नाती लग्नामुळे जोडली जातात…
पण काही नाती अशी असतात, जी फक्त माणुसकी, आपुलकी आणि प्रेमामुळे तयार होतात. आमचं आणि त्यांचं नातंही असंच होते. शेजारचे नातं हळूहळू नात्यांच्या पलीकडे जात होतं. 2002 साली आमही ही दोन खोलया खाली राहयला गेलो.त्यानंतर विकास हयांची ही बदली ,दुसरी कडे झाली.ही फॅमली दुसरी कडे राहयला गेली.आठवण मात्र आयुष्यभर मनात कायम राहीली.वर्षा मागूण वर्ष गेले.2016 साली आमही ही बारामतीत सथायीक झालो. पण महणतात ना पृथ्व गोल आहे.मी जया कंपनीत कामाला लागलो होतो तिथे ओहाळ साहेब बदली होऊन आले होते.ओहाळ साहेब महणजेच आमचया वालचंदनगर चया चाळीत राहयचे,तयांचे आणी विकास हयांची मैत्री आहे .तयांनी मला एखदा विकास हयांचा नंबर दिला.टेकनोलोजी खुप पुढे गेली होती .आई बारामतीलाच होती whats up वर आमही फोन केला,विकास हयांचयाशी बोलणे झाले ,
तयांनी तो कॉल बिहार मधये जोडूण दिला ,22 वर्षांनी उज्ज्वल,भाभी ,आणी तयाचया छोटया बहीणीला आईने व्हिडीओ कॉल वर बघीतले.ओहाळ साहेंबाची बदली झाली आणी ते परत बारामतीला आले,16 ऑगस्ट 2026 ला एखदा ऑफीस मधये फोन आला;
ओहाळ साहेब पहीलयांदा बोले आणी नंतर व्हिडीओ कॉल वर विकास होते ,” पहचाणा पंकज हम वालचंदनगर के होई घरके सामणे खडे है;” माझया मनात घडयाळाचे काटे मागे फिरले,परत तीव्रतेने सर्व आठवणी जाग्या झालया.आणी मी तयांना भेटणयासाठी गेलो ,24 वर्षा नंतर विकास आणी भाभी हयांची गाठ पडली.उजजलचया आठवणी परत जागया झालया..आता मात्र आठवण आली की कोल्हापूर ला जायच हे नककी एक फुटावर असणारा शेजार कधी हजारो किलोमिटर दूर गेला तर कधी 240 किलोमीटर जवळ आला. जवळ आल्याचा आनंद मात्र झाला आहे. त्यांच्या बँकेतील बदली मुळे अंतर बदलत राहिले पण मनातील अंतर कधीच बदले नव्हते आणी बदलणार ही नाही .
लेखक : पंकज प्रदिप अंबिके
– बारामती –
मो .नंबर : -८३०८५३७५८३
