सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अधिक पारदर्शक, सदोषरहित आणि गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ (Mission Sudhar) अभियानाला उत्तम यश मिळत आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली २ ऑगस्ट २०२६ ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली असून, एकूण उद्दिष्टापैकी ७१.७८ टक्के काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
‘मिशन सुधार’ अंतर्गत रास्त भाव दुकाने व शिधापत्रिका व्यवस्थापनाशी संबंधित माहिती शासनाकडून पुरविण्यात आलेली आहे, ज्यामध्ये Gross Turnover (उलाढाल), Income Group (उत्पन्न गट), Individual as Director (संचालक म्हणून व्यक्ती), PFMS आणि Postal संबंधित लाभार्थी फेरबदल व सुधारणांचा समावेश आहे. या यादीस अनुसरून ‘मिशन सुधार’ अंतर्गत लवकरात लवकर पात्र लाभार्थी व अपात्र लाभार्थी यांची पडताळणी करण्यात येऊन अपात्र लाभार्थ्यांना शुभ्र शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.
पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शक सेवा पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीचा कारभार अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासाठी महसूल व पुरवठा यंत्रणा कटिबद्ध आहे. ज्या तालुक्यांमध्ये काम अजूनही प्रलंबित आहे, तेथील संबंधित अधिकाऱ्यांना गती वाढविण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित कामेही निश्चित मुदतीत पूर्ण करून सांगली जिल्ह्याला शंभर टक्के प्रगतीकडे नेण्याचे ध्येय पुरवठा विभागाने ठेवले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
