पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या शैक्षणिक विकासाच्या संकल्पनेला कोळपे मतदारसंघातून गती
सौ. सुवर्णा महेश संसारे यांचा जि. प. शाळांना भेटी देऊन सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी
वैभववाडी
ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, सक्षम शैक्षणिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाची संधी मिळावी, या जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेला गती देण्यासाठी पंचायत समिती कोळपे मतदारसंघाच्या सदस्या सौ. सुवर्णा महेश संसारे यांनी मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांच्या विकासाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
याच अनुषंगाने दिगशी, तिथवली तावडेवाडी, वेंगसर नं. १, मांगवली नरसाळवाडी आणि धनगरवाडा येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन सौ. सुवर्णा महेश संसारे यांनी शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि उपलब्ध शैक्षणिक साधनसामग्रीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून शाळांच्या अडचणी, आवश्यक सुविधा आणि प्रलंबित समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच शाळांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता समाधानकारक व उल्लेखनीय असल्याचे पाहून सौ. सुवर्णा संसारे यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
“शाळा ही ग्रामीण भागाच्या विकासाची खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या आणि शिक्षकांच्या प्रयत्नांना योग्य पाठबळ मिळाले, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करू शकतात,” असा विश्वास सौ. सुवर्णा महेश संसारे यांनी व्यक्त केला.
शाळांच्या समस्या व गरजा प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. पालकमंत्री मा. ना. नितेशजी राणे साहेब यांच्या अपेक्षेप्रमाणे कोळपे मतदारसंघातील शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा, सांस्कृतिक व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी युवा कार्यकर्ते स्वप्नील धुरी, मांगवली सरपंच शिवाजी नाटेकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल राणे, केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील, ज्योत्स्ना पाटील, शिक्षक मनोहर खरात, शामराव शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
“दर्जेदार शिक्षण • सक्षम शाळा • गुणवंत विद्यार्थी • विकसित कोळपे”
