सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ शांततामय, सुव्यवस्थित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेने व्यापक नियोजन केले आहे. गणेशोत्सव मंडळांना मंडप, कमान, स्टेज आदी विविध परवान्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागू नये आणि परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान व्हावी, यासाठी महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये ‘एक खिडकी’ परवानगी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.
ही सुविधा दि. १ सप्टेंबर २०२६ पासून कार्यान्वित होणार असून, संबंधित मंडळांचे अर्ज स्वीकारणे, छाननी, जागेची पाहणी, शुल्क आकारणी व भरणा तसेच आवश्यक परवानग्यांची कार्यवाही एकाच ठिकाणी समन्वयाने करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त श्रीमती संजीता महापात्रा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
चारही प्रभाग समित्यांमध्ये ‘एक खिडकी’ केंद्रे
प्रभाग समिती ‘एक खिडकी’चे ठिकाण
प्रभाग समिती क्र. १ मनपा मुख्यालय इमारत, सांगली, प्रभाग समिती क्र. २ विश्रामबाग गणपती मंदिरामागे, सांगली, प्रभाग समिती क्र. ३ कुपवाड विभागीय कार्यालय, कुपवाड
प्रभाग समिती क्र. ४ मिरज विभागीय कार्यालय, मिरज.
या केंद्रांवर महापालिकेच्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत आवश्यकतेनुसार पोलीस, वाहतूक पोलीस आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी/कर्मचारी समन्वयाने उपलब्ध राहणार आहेत.
परवानगी प्रक्रिया अधिक गतिमान-
गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेल्या अर्जांची संबंधित विभागाकडून छाननी करून आवश्यक असल्यास जागेची प्रत्यक्ष पाहणी व शुल्क आकारणी करण्यात येईल. शुल्क भरल्यानंतर अंतिम परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्राप्त परवानगी अर्ज शक्यतो तत्काळ आणि जास्तीत जास्त २४ तासांच्या आत निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्याही स्तरावर अनावश्यक विलंब, हयगय अथवा टाळाटाळ होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेण्यात येणार आहे.
महापालिका–पोलीस–वीज वितरण–वाहतूक विभागांचा समन्वय
गणेशोत्सव काळात मंडप, कमानी, विद्युत जोडणी, वाहतूक व्यवस्था व कायदा-सुव्यवस्था यासंदर्भातील विविध बाबींचा विचार करून परवानगी प्रक्रिया करण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित विभागांना त्यांच्या अखत्यारीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ‘एक खिडकी’ केंद्रावर आवश्यक ना-हरकत दाखले (NOC) व संबंधित कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
यामुळे गणेशोत्सव मंडळांना विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे पाठपुरावा करण्याची आवश्यकता कमी होणार असून, एकाच ठिकाणी समन्वयित पद्धतीने परवानगी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
मंडप, कमान व स्टेज परवानगीसाठी विशेष व्यवस्था ‘एक खिडकी’ केंद्रांवर प्रामुख्याने पुढील कामकाज करण्यात येणार आहे :
गणेशोत्सव मंडळांकडून परवानगी अर्ज स्वीकारणे. अर्जातील माहिती व कागदपत्रांची प्राथमिक छाननी करणे. संबंधित अभियंत्यांकडून जागेची पाहणी करून घेणे. मंडप/कमान/स्टेज आदींसाठी नियमानुसार शुल्क निश्चित करणे. निर्धारित शुल्क स्वीकारणे. आवश्यक विभागांकडून ना-हरकत दाखले प्राप्त करून घेणे. पोलीस व वाहतूक विभागाशी आवश्यक समन्वय साधणे. आवश्यक अटी व शर्तींच्या अधीन राहून अंतिम परवानगी देणे. प्राप्त अर्ज व निर्गमित परवान्यांची नोंद व्यवस्थित ठेवणे. दररोज किती मंडळांना व किती कमानींना परवानगी देण्यात आली, याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
कायदा-सुव्यवस्था व वाहतूक व्यवस्थेलाही प्राधान्य
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ होत असल्याने मंडप, कमानी व मिरवणूक मार्गांबाबत कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत राहणे यास विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधित पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधूनच आवश्यक परवानगी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
विद्युत सुरक्षेचीही काळजी
गणेशोत्सव मंडळांच्या मंडप व विद्युत रोषणाईसंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार आहे. विद्युत जोडणी व संबंधित सुरक्षेच्या बाबतीत नियमांचे पालन करूनच आवश्यक ना-हरकत व परवानगी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
गणेश मंडळांना महापालिकेचे आवाहन
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व माहिती पूर्ण स्वरूपात सादर करावी. मंडप, कमान, स्टेज किंवा इतर संरचना उभारण्यापूर्वी महापालिकेची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे.
मंडळांनी शेवटच्या क्षणी गर्दी न करता १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘एक खिडकी’ सुविधेचा लाभ घेऊन वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
“सार्वजनिक गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. गणेश मंडळांना परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान व्हावी, यासाठी महापालिकेने चारही प्रभाग समित्यांमध्ये एक खिडकी व्यवस्था सुरू केली आहे. सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून परवानगी प्रक्रिया पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.” असे आवाहन करण्यात आले आहे.
