You are currently viewing जयराम धोंडगे अनुवादित ‘झुंज कॅन्सरशी’ला राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार’

जयराम धोंडगे अनुवादित ‘झुंज कॅन्सरशी’ला राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार’

सातारा:

साहित्य, वाचन आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम साधणाऱ्या अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्यात विविध साहित्यिकांच्या उल्लेखनीय साहित्यकृतींचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ आरोग्यविषयक साहित्य प्रकारातील ‘अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार २०२५’ जाहीर करून ‘झुंज कॅन्सरशी’ या मराठी अनुवादासाठी गझलकार जयराम धोंडगे यांचा सन्मान करण्यात आला.

‘झुंज कॅन्सरशी’ हे डॉ. सचिन मर्दा यांच्या I Am Unstoppable या इंग्रजी पुस्तकाचे मराठी रूपांतर आहे. कर्करोगासारख्या गंभीर विषयाकडे केवळ आजार म्हणून न पाहता, त्याविषयीची जागरूकता, सकारात्मकता, संघर्षाची मानसिकता आणि जगण्याची उमेद वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा अनुवाद करण्यात आला आहे. त्यामुळे या साहित्यकृतीला मिळालेला पुरस्कार हा केवळ अनुवादाचा नव्हे, तर आरोग्यविषयक जनजागृतीच्या प्रयत्नांचा गौरव ठरतो.

सातारा येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या हस्ते धोंडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवी व गझलकार धनंजय तडवळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने आणि संस्थापक श्री. रवींद्र भारती यांच्यासह पदाधिकारी, साहित्यिक, लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय पुरस्कारांसोबत विशेष पुरस्कार आणि सातारा जिल्ह्यातील लेखकांसाठी ‘अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार’ अशा विविध साहित्यप्रकारांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. साहित्य, वाचन आणि सामाजिक बांधिलकी यांना प्रोत्साहन देणाऱ्या अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाची ही उपक्रमशील वाटचाल उल्लेखनीय आहे. डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक श्री. रवींद्र भारती यांच्या पुढाकारातून हा साहित्यिक उपक्रम सातत्याने समृद्ध होत आहे.

‘झुंज कॅन्सरशी’ला मिळालेला हा सन्मान मराठी भाषेतून आरोग्यविषयक संवेदनशील साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देणारा आहे अशी प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त लेखक जयराम धोंडगे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा