“तरुणांनो तुम्ही देशाचे मुख्य स्तंभ आहात” – मा. शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन संपन्न
मालवण
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी मा. शारदा पोवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात NSS लक्ष्यगीताने झाली. यावेळी NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी उद्बोधन सत्रात चालू शैक्षणिक वर्षातील NSS विभागाच्या नियोजित उपक्रमांची व प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. यावर्षी NSS विभागाच्या वतीने डिजिटल साक्षरता, मानसिक आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. हे प्रकल्प महाविद्यालयाच्या दत्तक गावांपैकी कोळंब, सर्जेकोट आणि साळेल या गावांमध्ये राबविण्याचे नियोजन असल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले.
या उपक्रमांमागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी NSS स्वयंसेवकांनी केवळ महाविद्यालयापुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून जनजागृती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीची भूमिका प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी मा. शारदा पोवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “तरुणांनो तुम्ही देशाचे मुख्य स्तंभ आहात” असे सांगत NSS स्वयंसेवकांना समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील NSS स्वयंसेवक म्हणूनच्या अनुभवांना त्यांनी उजाळा दिला. NSS मधून मिळणारे अनुभव, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संघभावना यांचा व्यावहारिक जीवनात मोठा उपयोग होतो, असे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
यावर्षी NSS विभागाने हाती घेतलेल्या डिजिटल साक्षरता, मानसिक आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण या प्रकल्पांचे त्यांनी विशेष कौतुक केले. समाजाच्या सध्याच्या गरजांशी संबंधित असलेले हे विषय असून, अशा उपक्रमांमधून NSS स्वयंसेवकांची समाजाशी असलेली नाळ अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी स्वयंसेवकांना प्रेरणा देणारी स्वरचित कविता सादर केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कैलास राबते यांनी NSS स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना NSS चे बोधचिन्ह आणि “Not Me But You” या ब्रीदवाक्यामागील सेवा आणि त्यागाची भावना स्पष्ट केली. NSS स्वयंसेवकांनी स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे भवितव्य घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. “स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्याची ही उत्तम संधी आहे,” असे सांगताना त्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आपल्या NSS अनुभवांना उजाळा दिला. NSS स्वयंसेवक म्हणून घेतलेल्या कष्टांचा उपयोग आयुष्यभर होत राहिला आणि त्यातून यशस्वी होण्यास मदत झाली, असे त्यांनी सांगितले. आपल्या अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी विद्यमान NSS स्वयंसेवकांना प्रेरित केले.
NSS विभागातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेला लेखन प्रेरणा दिवस, स्वच्छता पंधरवडा आणि नशामुक्त युवा अभियान यांच्या अनुषंगाने १० ऑगस्ट २०२६ रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी:
– प्रथम क्रमांक: मयुरी अविनाश परब
– द्वितीय क्रमांक: अंबाजी वलकर व पूर्वा परब
– तृतीय क्रमांक: रिद्धी केळुसकर व दीक्षा परुळेकर
तसेच, या शैक्षणिक वर्षासाठी NSS विभागात विद्यार्थी नेते म्हणून निवड करण्यात आलेल्या गौतम मानवर, रिद्धी काजरेकर, हर्षद पाटकर आणि अपूर्वा पालव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. संकेत बेळेकर यांनी केले, तर प्रा. योगिता सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास ७५ NSS स्वयंसेवक, १५ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इकोमेट्स संस्थेच्या मनिषा पारकर उपस्थित होत्या.
समाजाभिमुख विविध प्रकल्पांची आखणी, स्वयंसेवकांना मिळालेले प्रेरणादायी मार्गदर्शन आणि विद्यार्थी नेतृत्वाचा गौरव यामुळे NSS उद्घाटन व उद्बोधन समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांच्या संयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.
