*तालुकास्तरीय सुर्यनमस्कार स्पर्धेत मोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी*
*दोडामार्ग*
ओम नित्य दिव्य योगाश्रम, गोवा, गुरुचरित्र सेवा, दोडामार्ग व दीपस्तंभ फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हळबे महाविद्यालय येथे आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय सुर्यनमस्कार स्पर्धेत मोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
योग, शिस्त, एकाग्रता, संतुलन आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम साधत विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची प्रभावी छाप उमटवली.
या स्पर्धेत शाळेची विद्यार्थीनी परी ठाकूर हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच तनिष्का गोरड हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. याशिवाय दुर्वा ठाकूर, इशा ठाकूर, गौरीता दळवी, श्रावणी परब, अन्वी कदम, आरोही कदम, वेदा कदम, नेहा पिरणकर, प्रणव ठाकूर, मेधांश पिरणकर, शंकर पिरणकर, अद्विक पवार, आयुष कदम, तन्मय कदम आणि आयांश कदम यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेच्या निमित्ताने मोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले सामूहिक योगा नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. योगासनांच्या विविध मुद्रा, तालबद्ध हालचाली आणि आकर्षक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले. त्यांच्या या अनोख्या सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले. या उत्कृष्ट योगा नृत्यासाठी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील योगशिक्षिका स्वाती पाटील व संतोष गवस यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली.
मोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल, पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत, मोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुधीर जोशी, सूर्यकांत निर्मळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
योगासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक एकाग्रता, संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होत आहे. मोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा व योग क्षेत्रातील यशाला नवी झळाळी मिळाली असून विद्यार्थ्यांच्या या कामगिरीने शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
