निरुखेतील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून सोडवू
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत; २०० ग्रामस्थांना मोफत एनसीएमसी कार्डचे वाटप
कुडाळ
निरुखे-पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असून, सर्वसामान्य नागरिकांना एसटी बस प्रवासात सवलत मिळवून देणारे एनसीएमसी कार्ड मोफत उपलब्ध करून देणे हा स्तुत्य आणि सामाजिक उपक्रम आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निरुखे येथे केले.
शिवसेनेच्या वतीने कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने निरुखे ग्रामपंचायत सभागृहात सुमारे २०० ग्रामस्थांना मोफत एनसीएमसी (NCMC) कार्डचे वाटप करण्यात आले. एसटी बस प्रवासासाठी सवलत देणाऱ्या या कार्डसाठी आकारण्यात येणारे २०० रुपयांचे नोंदणी शुल्कही मोफत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, सरपंच कीर्तिकुमार तेर्से, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे, श्रमिक कामगार कल्याणकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्यासह प्रथमेश केळबाईकर, किरण नाईक, सत्यवान गुरव, संस्कृती पालव, सिद्धी तेरसे, रिया नाईक, काव्या तेरसे, बाळकृष्ण तेरसे, मुकेश पालव, बी.एल. तेरसे, रामदास करंदीकर, विष्णू नाईक, सुनील परब, सरिता तेरसे, रोशन गावकर, प्रसाद नाईक, बबन मेस्त्री, सुहास तेरसे आदी उपस्थित होते.
दत्ता सामंत म्हणाले की, प्राजक्त चव्हाण यांनी सेवाभावी वृत्तीने गावातील गरीब व सर्वसामान्य ग्रामस्थांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी हा कॅम्प आयोजित केला आहे. स्वतःचा वेळ देऊन तळमळीने नागरिकांसाठी काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे. प्राजक्त चव्हाण यांचे काम पाहता ते भविष्यात गावाच्या विकासासाठी चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दादा साईल म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या एसटीला ‘लालपरी’ म्हणून ओळखले जाते. एसटीच्या गाड्या कमी असणे, रुग्णवाहिका व अन्य वाहतूक सुविधांशी संबंधित अनेक समस्या आहेत. या समस्या कमी करण्यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्नशील असून, गेल्या दीड वर्षात कुडाळ-मालवण भागात जवळपास २५ एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एनसीएमसी कार्डसाठी लागणारे २०० रुपयांचे नोंदणी शुल्क पूर्णपणे मोफत करण्यात आले असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे. निरुखे गावाच्या विकासासाठी खासदार नारायण राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी निधीची कमतरता भासू दिली नसल्याचेही दादा साईल यांनी सांगितले.
प्राजक्त चव्हाण हे निरुखे गावचे सुपुत्र असून, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवण्यासाठी अधिकाधिक कॅम्प व उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पेंडुरकर यांनी केले.
