फोंडाघाटमध्ये अतिरिक्त प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापरावर बंदीची मागणी
फोंडाघाट :
फोंडाघाट परिसरात वाढत असलेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत असून, अतिरिक्त प्लास्टिक कॅरीबॅग तसेच इतर प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी फोंडाघाट व्यापारी संघ आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बाजारपेठ तसेच परिसरातील विविध दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. प्लास्टिक पिशव्या नाल्या, गटारे तसेच सार्वजनिक ठिकाणी पडून राहिल्याने अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
ग्रामपंचायतीने व्यापारी संघाच्या सहकार्याने दुकानदार व नागरिकांमध्ये प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती करावी. ग्राहकांना कापडी किंवा पर्यायी पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन करून अतिरिक्त प्लास्टिक कॅरीबॅग व प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी. केवळ कारवाई न करता सातत्याने तपासणी करून प्लास्टिक वापरावर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
‘प्लास्टिकमुक्त फोंडाघाट’ या उद्देशाने व्यापारी संघ, ग्रामपंचायत आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज असून, यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
