*सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत! – डॉ. श्रीपाल सबनीस*
*कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. राजनीश कामत लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*
पिंपरी
‘भारत हा कोणत्याही एका महामानवाचा, एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे अशा सर्व महामानवांच्या मानवतावादी सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे केले. पिंपरी, पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे येथील शाहू स्मारक भवनात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार’ आणि ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. एन. डी. जत्राटकर आणि ज्येष्ठ पत्रकार, लेखक डॉ. संजय थोरात यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, भारतीय संस्कृतीची निर्मिती केवळ एका जातीत, धर्मात किंवा अभिजन-बहुजनाच्या कोणत्याही एका समूहात झालेली नाही. सर्व जाती-धर्म, आदिवासी समाज, अभिजनांचे ज्ञान, बहुजनांचे श्रम आणि सामान्य माणसाचे योगदान यांतून भारतीय संस्कृती घडली आहे. त्यामुळे कोणत्याही एका विचाराला वगळून भारताचा समग्र विचार करता येणार नाही.
बाबा भारती हे समन्वय, समता आणि संवादाचे प्रतीक होते. बाबा भारती बौद्ध विचारांशी निष्ठावान असले तरी एका धर्माच्या चौकटीत अडकले नाहीत. बुद्ध धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्सवाद, गांधीवादी विचार यांसह विविध ज्ञानपरंपरांचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला. विविध विचारांमधील मानव कल्याणकारी मूल्यांचा समन्वय साधणे ही त्यांची भूमिका होती. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानने त्यांची हीच समन्वयवादी भूमिका पुढे नेत विविध जातिधर्मांतील आणि सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मानवतावादी दृष्टीच्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना बाबा भारती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना मला विशेष आनंद वाटतो. शिवाजी विद्यापीठातील पाली भाषेच्या अभ्यासक्रमाला बाबा भारतींचे नाव देण्याबाबत विचार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी, बाबा भारती यांच्या कार्याचा गौरव करताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी पाली भाषा, बौद्ध वाङ्मय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयुष्यभर केलेले कार्य अतुलनीय असल्याचे सांगितले. १९८७ मध्ये प्रकाशित झालेला सुमारे २५ हजार शब्दांचा पाली-मराठी शब्दकोश हे त्यांच्या कार्याचे शिखर असून, पाली भाषेचा आणि बौद्ध वाङ्मयाचा विस्मृतीत गेलेला समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले, असे त्यांनी नमूद केले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या शैक्षणिक नेतृत्वाचा उल्लेख करताना, संशोधन, तंत्रज्ञान, डिजिटल युगातील आव्हाने आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संक्रमणकाळात त्यांनी विविध महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व केले असून शिवाजी विद्यापीठाच्या ज्ञान, संशोधन व शिक्षणाच्या समृद्ध परंपरेला आधुनिक काळात पुढे नेण्याचे कार्य ते करीत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. चांगला शिक्षक, संशोधक, विचारवंत आणि लेखक आपल्या कार्याचा गंध दीर्घकाळ समाजात टिकवून ठेवतो आणि अशा कर्तृत्वाची स्मृती जिवंत ठेवण्याचे काम पुरस्कारांच्या माध्यमातून होते, असेही त्यांनी नमूद केले.
पुरस्काराला उत्तर देताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी लोकशिक्षक बाबा भारती यांच्या कार्याचा गौरव करताना, पाली-मराठी शब्दकोशाच्या माध्यमातून त्यांनी बुद्धांचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य केले असल्याचे सांगितले. हा शब्दकोश केवळ शब्दांचा संग्रह नसून ज्ञानाचे लोकशाहीकरण करणारा आणि सामान्य माणसाला मूळ बुद्धविचारांशी जोडणारा महत्त्वपूर्ण सेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्ञान हे विद्यापीठे आणि ग्रंथालयांच्या चौकटीत मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, हीच लोकशिक्षकाची खरी भूमिका असल्याचे स्पष्ट करत त्यांनी शिक्षकापेक्षा लोकशिक्षक बनण्याचे मोठे सामाजिक दायित्व अधोरेखित केले. नव्या पिढीशी केवळ वर्गखोल्यांतून नव्हे, तर त्यांच्या मनाशी व हृदयाशी संवाद साधत ज्ञानाचा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता व्यक्त करत, बाबा भारती यांच्या नावाने मिळालेला हा जीवनगौरव सन्मान आपण कृतज्ञतेने स्वीकारत असून शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीला अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त डॉ. एन.डी. जत्राटकर आणि डॉ. संजय थोरात यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले; तर प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. हरिष भालेराव, डी.जी. भास्कर, डॉ. किसनराव कुराडे, डॉ. जी.बी. अंबपकर, अनिल म्हमाणे, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. मानसिंग टाकळे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरुषोत्तम सदाफुले, विनायक ठोंबरे, अजित पाटील, मल्हार जोशी, आनंदा कांबळे, प्रकाश कांबळे, सचिन कांबळे, आर.के. कांबळे, आप्पा देशमुख, विजय कांबळे, हंबीरराव पाटील, रमेश ढाले, रविंद्र भारती, निमिष भारती, शार्दूल भारती, जय भारती, अमोल ढाले, राजरत्न गाडे आणि अभिजीत भोसले यांनी संयोजन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*फोटोओळ-*
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस. सोबत (डावीकडून) डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. एन.डी. जत्राटकर, महेंद्र भारती, डॉ. संजय थोरात आणि डॉ. आलोक जत्राटकर.
