निराधार आजोबांचे मरणोत्तरही समाजसेवेत योगदान
दिविजा वृद्धाश्रमातील शंकर सावंत यांचे नेत्रदान व देहदान; पाच वर्षांनी आश्रमाने दिला भावपूर्ण निरोप
सिंधुदुर्ग :
गेली पाच वर्षे दिविजा वृद्धाश्रमात निराधार म्हणून वास्तव्य करणारे श्री. शंकर पांडुरंग सावंत (वय ७२) यांचे बुधवारी, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता निधन झाले. मृत्यूनंतरही त्यांचे डोळे आणि देह समाजाच्या उपयोगी यावा, या भावनेतून दिविजा वृद्धाश्रमाचे सचिव संदेश शेट्ये यांनी पुढाकार घेत त्यांचे नेत्रदान व देहदान केले. त्यांच्या या निर्णयामुळे मरणोत्तरही शंकर आजोबांचे समाजासाठी योगदान कायम राहणार आहे.
शंकर सावंत आजोबा दिविजा वृद्धाश्रमात येण्यापूर्वी अत्यंत आजारी अवस्थेत जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अनोळखी व्यक्ती म्हणून दाखल झाले होते. काही महिने रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ओरोस रुग्णालयाच्या समुपदेशक रेश्मा बाईप यांनी दिविजा वृद्धाश्रमाचे सचिव संदेश शेट्ये यांच्याशी संपर्क साधून त्यांची माहिती दिली. त्यानंतर शंकर सावंत यांना दिविजा वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले.
आश्रमात आल्यानंतर त्यांना एक नवीन कुटुंबच मिळाले. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत ते आश्रमातील इतर आजी-आजोबांसोबत आनंदाने राहू लागले. वयोमानामुळे त्यांची दृष्टी कमी झाली होती. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय संदेश शेट्ये यांनी घेतला. विवेकानंद नेत्रालय, कणकवली यांच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जग पाहण्याची संधी मिळाली.
गेली पाच वर्षे ते दिविजा वृद्धाश्रमात आनंदाने राहत होते. मात्र वाढत्या वयामुळे ते दिवसेंदिवस थकत गेले आणि अखेर १९ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आश्रमातील सर्वांनी मोठ्या अंतःकरणाने त्यांना भावपूर्ण निरोप दिला.
‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या विचारातून त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कार्य समाजाच्या उपयोगी यावे, या उद्देशाने संदेश शेट्ये यांनी देहदानाचा निर्णय घेतला. शंकर सावंत यांच्या इच्छेनुसार ऑगस्ट २०२३ मध्येच देहदान व नेत्रदानाचा फॉर्म भरून ठेवण्यात आला होता. त्यानुसार सर्व शासकीय नियमांचे पालन करून त्यांच्या डोळ्यांचे दान जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे करण्यात आले, तर त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील शरीररचनाशास्त्र विभाग, ओरोस यांच्याकडे देहदान करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेस फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे चीफ को-ऑर्डिनेटर डॉ. विद्याधर तायशेटे, विभागीय को-ऑर्डिनेटर प्रमोद लिमये, सिव्हिल हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मिक ऑफिसर कौस्तुभ देशपांडे तसेच डॉ. सौ. प्राजक्ता थेटे यांनी सहकार्य केले.
शंकर सावंत यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांच्या निधनानंतरची सर्व कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया दिविजा वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक संदेश शेट्ये व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. निराधार अवस्थेत आयुष्याचा शेवटचा टप्पा आश्रमात प्रेमाने जगलेल्या शंकर आजोबांनी मृत्यूनंतरही नेत्रदान आणि देहदानाच्या माध्यमातून समाजाला अनमोल योगदान दिले आहे.
