You are currently viewing *स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनी कोलगाव येथील फणसवाडी परिसरात मोठ्या उत्साहात व जबाबदारीने राबविला स्वच्छता अभियान उपक्रम

*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनी कोलगाव येथील फणसवाडी परिसरात मोठ्या उत्साहात व जबाबदारीने राबविला स्वच्छता अभियान उपक्रम

*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनी कोलगाव येथील फणसवाडी परिसरात मोठ्या उत्साहात व जबाबदारीने राबविला स्वच्छता अभियान उपक्रम :*

सावंतवाडी

दि. १५ ऑगस्ट २०२६, शनिवार रोजी स्वातंत्र्य दिन व जागतिक युवक दिनाचे औचित्य साधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये हरितसेना विभागाच्या वतीने ‘स्वच्छतेचा ध्यास, आरोग्याचा विकास’ या ब्रीदवाक्यांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनी कोलगाव येथील फणसवाडी परिसरात मोठ्या उत्साहात व जबाबदारीने स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविला. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. प्रशालेचे संचालक श्री. रुजूल पाटणकर यांच्या दूरदृष्टीतून ‘शिस्तीकडून स्वच्छतेकडे आणि स्वच्छतेकडून आरोग्याकडे’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून या स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले.

शाळेच्या जवळील कोलगाव येथील फणसवाडी परिसरात सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० या वेळेत हे अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी परिसराची पाहणी करून तेथील अस्वच्छतेची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवली. विविध प्रकारचा कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, काचेचे तुकडे, डायपरच्या पिशव्या, सॅनिटरी पॅड्स तसेच इतर अविघटनशील कचरा परिसरात आढळून आला. पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणी कचरा साचल्याने दुर्गंधी निर्माण झाली होती. या अस्वच्छतेचा मानवी आरोग्य व पर्यावरणावर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करून ओला व सुका कचरा तसेच प्लास्टिक व काचेचा कचरा यांचे योग्य वर्गीकरण केले. स्वच्छता अभियानादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली. स्वच्छतेनंतर परिसर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी झाला.

केवळ परिसर स्वच्छ करणे एवढाच या अभियानाचा उद्देश न ठेवता, स्वच्छ केलेला परिसर पुन्हा अस्वच्छ होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात केला.

या उपक्रमांतर्गत परिसरात स्वच्छतेविषयक फलक लावण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली.

या उपक्रमासाठी प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर तसेच प्रशालेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव, सहा. शिक्षिका कु. निलोफर शेख, कु. सुधा गावस, कु. दीपिका सावंत या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या उपक्रमाचे आयोजन व नियोजन हरितसेना प्रमुख सौ. सुषमा पालव व कु. सुधा गावस यांनी केले. विद्यार्थ्यांनी एकजुटीने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हे अभियान यशस्वी केले.
विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची नगरपालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि कौतुक केले. त्यामुळे हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अधिकच प्रोत्साहनदायक ठरला. ही मोहीम शेवट नसून, सजग नागरिकत्व आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. यापुढेही अशा अभियानांचे आयोजन करण्यात येईल.

हरितसेना विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले हे स्वच्छता व पर्यावरण जागृती अभियान विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रभावी संगम ठरले. ‘स्वच्छ परिसर—निरोगी जीवन’ या संदेशातून पर्यावरणाचे संरक्षण आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अशाप्रकारे आजचा हा उपक्रम मोठ्या जबाबदारीने व उत्साहात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा