तिराळीवाडी येथे जीर्ण व धोकादायक आंब्याचे झाड हटवले; राजेंद्र निंबाळकरांची तत्परता
दोडामार्ग-विजघर मुख्य राज्यमार्गावरील संभाव्य धोका टळला; नागरिकांकडून निंबाळकरांचे कौतुक व आभार
दोडामार्ग :
दोडामार्ग-विजघर मुख्य राज्यमार्गावरील तिराळीवाडी येथे रस्त्यालगत अनेक दिवसांपासून जीर्ण व धोकादायक अवस्थेत उभे असलेले आंब्याचे भलेमोठे झाड अखेर हटविण्यात आले. हे झाड कधीही कोसळून वाहनचालक, पादचारी तसेच प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी हे झाड तातडीने हटविण्याची मागणी केली होती.
नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी पुढाकार घेत स्वतःचा जेसीबी घटनास्थळी पाठविला. तसेच स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून जीर्ण व धोकादायक झाड पाडून घेतले. त्यानंतर झाडाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यात आला.
कोणत्याही दुर्घटनेची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत निंबाळकर यांनी केलेल्या या तातडीच्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठा धोका टळला आहे. त्यांच्या तत्परतेमुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
राजेंद्र निंबाळकर हे कायमच जनसेवेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असतात. नागरिकांच्या अडचणीच्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी धावून जाणे, समस्या समजून घेणे आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
तिराळीवाडी येथील धोकादायक झाड हटविण्याच्या या तत्पर कार्यवाहीबद्दल स्थानिक नागरिकांसह सर्व स्तरातून राजेंद्र निंबाळकर यांचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
