सावंतवाडीचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांचे निधन
६० वर्षांहून अधिक काळ बजावली रुग्णसेवा; अचूक निदान आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या उपचारांसाठी होते प्रसिद्ध
सावंतवाडी
येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर (वय ८३) यांचे सोमवारी सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सावंतवाडी परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. खानोलकर यांनी सावंतवाडीत गेली ६० हून अधिक वर्षे वैद्यकीय सेवा बजावली. गांधी चौक परिसरातील त्यांच्या दवाखान्यात बालरुग्णांची मोठी गर्दी असायची. अचूक निदानासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. कोणत्याही अनावश्यक तपासण्या न करता तसेच महागडी औषधे न लिहिता सर्वसामान्य रुग्णांना परवडतील अशी औषधे देण्यावर त्यांचा भर असायचा. त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तसेच पंचक्रोशीतील असंख्य रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत होते.
डॉ. खानोलकर हे आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठीही परिचित होते. लहान रुग्णांच्या नातेवाईकांना ते परिस्थितीचे गांभीर्य आणि आपले मत स्पष्टपणे सांगत असत. त्यांच्या या स्वभावामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा होता.
बांद्यातही दिली दीर्घकाळ रुग्णसेवा
डॉ. खानोलकर यांनी बांदा येथेही अनेक वर्षे रुग्णसेवा केली. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यालाही मोठी जोड होती. त्यांचे वडील कै. द. भि. खानोलकर यांना दोन दिवसांपूर्वीच बांदा गावाचा ‘ग्रामरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
कै. द. भि. खानोलकर हे शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा या संस्थेचे पदाधिकारी होते. बांदा येथील पहिली इंग्रजी माध्यमाची व्ही. एन. नाबर प्रशाला स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शाळेसाठी त्यांनी दारोदारी फिरून मदत उभी केली. गावातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
उद्या सकाळी अंत्यसंस्कार
डॉ. अरविंद खानोलकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव संजीवनी हॉस्पिटल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
